
Hair Color : कमी वयात केसांना कलर करणे हा आजकाल तरुणाईचा नवीन फॅशन ट्रेंड आहे. केस पांढरे झाले नसले तरी, सेलिब्रिटींसारखे केस दिसावेत असे तरुणांना खूप आवडते. अशीच एक आवड चीनमधील २० वर्षांच्या तरुणीला महागात पडली. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसारखे दिसण्याच्या नादात ती तरुणी जवळपास दर महिन्याला आपल्या केसांचा रंग बदलायची. अचानक तिच्या पोटात दुखू लागले आणि तपासणीदरम्यान धक्कादायक सत्य समोर आले. तपासणीत किडनीची समस्या असल्याचे निदान झाले. डॉक्टरही हे प्रकरण पाहून आश्चर्यचकित झाले. जाणून घ्या, हेअर कलरने तरुणीच्या किडनीला कसे नुकसान पोहोचवले आणि हेअर कलर करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
हुआ नावाची २० वर्षांची तरुणी केसांना कलर करायला खूप आवडायची. ती अनेकदा सलूनमध्ये जाऊन आपल्या आवडत्या कलाकाराप्रमाणे केस रंगवायची. बराच काळ असे केल्यानंतर, तरुणीला पोटदुखीसोबतच सांधेदुखीचा त्रास होऊ लागला. तसेच तिच्या पायांवर व्रण दिसू लागले. यानंतर जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली, तेव्हा डॉक्टरांनी तिची संपूर्ण तपासणी केली. तपासणीदरम्यान किडनीमध्ये इन्फ्लेमेशन म्हणजेच सूज असल्याचे निदान झाले.
डॉक्टरांनी सांगितले की, दीर्घकाळ केसांमध्ये कलर लावल्यामुळे असे झाले आहे. जेव्हा स्कॅल्पला रंग लागतो, तेव्हा तो शरीरातही पोहोचू शकतो. काही विषारी घटक जसे की पारा, शिसे देखील शरीरात पोहोचतात. हे केवळ किडनीलाच नाही तर फुफ्फुसांनाही नुकसान पोहोचवू शकतात. हेअर कलरमुळे कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो.
जर तुम्हाला केस रंगवायचेच असतील, तर केमिकल युक्त हेअर कलरऐवजी हर्बल, ऑरगॅनिक किंवा व्हेजिटेबल हेअर कलर निवडावा. नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या हर्बल कलरमुळे शरीराला ॲलर्जी होत नाही आणि ते कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवत नाहीत. हेअर कलर लावण्यापूर्वी पॅकेटवर दिलेले घटक नक्की तपासा. जर हेअर कलरमध्ये शिसे किंवा पारा असेल, तर तो अजिबात वापरू नका.