
Ginger Benefits : हिवाळ्यात शरीराचे तापमान राखणे, रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी सर्वात उपयुक्त घरगुती औषध म्हणजे आलं (Ginger). आयुर्वेदात आलं ‘उत्तम औषधी’ म्हणून ओळखलं जातं. त्यातील जिंजरॉल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म हिवाळ्यात शरीराला उब देतात, पचन सुधारतात आणि संक्रमणाशी लढण्याची ताकदही वाढवतात. त्यामुळे थंडीत आल्याचा आहारात नियमित समावेश केल्यास अनेक आरोग्य फायदे मिळतात.
थंडी वाढली की सर्वाधिक त्रास देणारी समस्या म्हणजे सर्दी-खोकला. आलं स्वाभाविकरीत्या शरीराला उब देते आणि घशातील सूज कमी करते. गरम पाण्यात आलं उकळून केलेले काढे किंवा आल्याचा चहा घेतल्यास कफ सैल होतो, नाक-घसा मोकळा होतो. जिंजरॉलबरोबरच अँटी-वायरल व अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. नियमित आल्याचा चहा घेतल्यास वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. थंड हवेत होणारी श्वसनमार्गातील अडचणही कमी होते.
हिवाळ्यात अन्न पचायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे गॅसेस, पोटफुगी, अपचन, मळमळ यांसारख्या तक्रारी वाढतात. आलं पचनसंस्थेचा वेग वाढवते आणि पोटातील रसांचे स्त्रवण सुरळीत करते. जेवणानंतर छोटा आल्याचा तुकडा खाल्ल्यास पोट हलकं वाटतं, तसेच अन्न सहज पचायला मदत होते. आयुर्वेदानुसार आलं ‘डीपक आणि पाचक’ आहे, म्हणजेच ते भूक वाढवते व आहार पचवण्यास सहाय्य करते. ज्यांना सतत पोटात गॅस होतो त्यांच्यासाठी आल्याचे पाणी हा उत्तम उपाय आहे.
हिवाळ्यात संक्रमणाचा धोका जास्त असतो. आल्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकतात, रक्ताभिसरण सुधारतात आणि इम्युनिटी वाढवतात. थंडीमुळे होणारी थकवा, अशक्तपणा, अंगदुखी यांपासूनही आलं आराम देते. नियमित आलं खाल्ल्यास शरीर बाहेरील तापमानातील बदलाशी सहज जुळवून घेतं. यामुळे हंगामी आजारांपासून संरक्षण मिळतं. आल्यात असलेले नैसर्गिक गुणधर्म शरीराला नैसर्गिक हीटरसारखे काम करून ऊब देतात.
थंड हवेत सांधे जास्त दुखू लागतात, खासकरून आर्थरायटिस, स्नायू दुखणे आणि सूज असणाऱ्यांना हा त्रास वाढतो. आलं रक्ताभिसरण सुधारून स्नायूंमधील जळजळ कमी करते. त्यातील जिंजरॉल दाह कमी करणारे घटक रक्तात सक्रिय करतात. यामुळे सांधेदुखी, पाठदुखी किंवा स्नायू दुखण्यामध्ये आराम मिळतो. काही अभ्यासांनुसार नियमित आल्याचे सेवन केल्यास शरीरातील क्रॉनिक इन्फ्लेमेशनही कमी होण्यास मदत होते.
थंडीच्या दिवसांत भूक जास्त लागते आणि गोड-तुपकट खाण्याची इच्छा वाढते. आलं मेटाबोलिझम वाढवून फॅट बर्न होण्यास मदत करते. आल्याचे गरम पाणी किंवा चहा पिल्यास शरीरातील कॅलरी बर्निंग प्रक्रिया वेगाने काम करते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. याशिवाय आलं इन्सुलिन लेव्हलला सपोर्ट करून साखरेचे प्रमाणही संतुलित ठेवते.