
बंगळुरु : एकेकाळी स्विगीचा डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करणारा एक तरुण आज कोटींचा मालक बनला आहे. ही गोष्ट आहे फरीदाबादच्या अजित कुमारची, ज्याची कहाणी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. आर्थिक संकट आणि वैयक्तिक अडचणींवर मात करून तो आज एक यशस्वी लेखक बनला आहे. घर चालवण्यासाठी एकेकाळी त्याने स्विगीमध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून काम केलं, पण त्याचवेळी भविष्यासाठी कठोर परिश्रमही घेतले. आणि आज तो करोडपती आहे!
गुंतवणूकदार राहुल माथूर यांनी पॉकेट एफएमवरील अजितची मुलाखत शेअर केल्यानंतर त्याची ही गोष्ट सोशल मीडियावर वेगाने पसरली. अजित सांगतो की, कोविड लॉकडाऊननंतर त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली होती. त्यामुळे त्याला कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि नोकरी शोधावी लागली. 'आयुष्यात सगळंच संपलंय असं वाटत होतं,' असंही अजित सांगतो. कुटुंबावरील कर्जाचा बोजा आणि कमी उत्पन्न यामुळे त्याने पोट भरण्यासाठी स्विगीमध्ये डिलिव्हरीचं काम सुरू केलं. कधी तो मेहंदी काढायला जायचा, तर कधी ब्राइडल मेकअपची कामंही करायचा.
एकीकडे तो मेहनत करून घर चालवत होता, तर दुसरीकडे भविष्यासाठी नवीन संधीही शोधत होता. पण एका अपघाताने सगळंच थांबल्यासारखं झालं. अपघातामुळे तो अंथरुणाला खिळला. कर्ज आणि हप्ते वाढतच गेले. त्याच दरम्यान त्याला पॉकेट एफएमची एक जाहिरात दिसली, ज्यात जाहिरातीसाठी स्क्रिप्ट लिहिण्याचं आवाहन केलं होतं. त्याने संधीचं सोनं केलं आणि पॉकेट एफएमसाठी आधी जाहिरात लिहिली, मग कथा लिहायला सुरुवात केली. पहिल्या कथेसाठी त्याला २०,००० रुपये मिळाले. त्यानंतर त्याने सातत्याने लिहायला सुरुवात केली. त्याची एक ऑडिओ मालिका प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर आली आणि त्यासाठी त्याला ५२,००० रुपये मिळाले. त्यानंतर त्याने ६.२९ लाख रुपयांचा आकडाही गाठला, ज्याने त्याचं आयुष्यच बदलून टाकलं.
गुंतवणूकदार राहुल माथूर यांनी 'X' वर अजित कुमारबद्दल लिहिताना त्याला 'करोडपती' म्हटलं आहे. त्यांनी लिहिलं, "पॉकेट एफएमवर लिहायला लागल्यापासून फरीदाबादचा एक स्विगी डिलिव्हरी पार्टनर करोडपती बनला आहे." माथूर यांनी सांगितलं की, अजित कुमार एका यशस्वी पॉकेट एफएम मालिकेमागे असून रॉयल्टीमधून तो कोट्यवधी रुपये कमावू शकतो. "'ब्रह्मोदय: द डिस्ट्रॉयर' या मालिकेचा अजित कुमार मुख्य लेखक आहे, ज्याला १६.८ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही मालिका २०२६ मध्ये सुरू झाली. ४.१६ कोटींपासून या मालिकेच्या व्ह्यूजमध्ये ४ पटींनी वाढ झाली आणि भागांची संख्या १३०० पेक्षा जास्त झाली आहे," असं त्यांनी नमूद केलं. "जानेवारी २०२६ मध्ये, त्याला जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आलं. यावर्षी, त्याचा शो १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणार असल्याने तो अनेक कोटी रुपये कमावेल," असंही माथूर यांनी म्हटलं आहे.
अजित स्पष्ट करतो की, या यशामागे फक्त नशीब नाही, तर सततचे प्रयत्न आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती आहे. 'संकटं आली तरी उमेद न हारता पुढे जात राहणं हाच आयुष्याने शिकवलेला सर्वात मोठा धडा आहे,' असं तो म्हणतो. कठीण काळातही नवीन कौशल्यं आत्मसात करण्याचा आणि संधी ओळखण्याचा प्रयत्न केल्यामुळेच आयुष्य बदललं, असंही त्याने सांगितलं.
अजितची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत. कोणतंही काम छोटं नसतं आणि आत्मविश्वास व कठोर परिश्रमाच्या जोरावर आयुष्यात मोठं यश मिळवता येतं, हा संदेश त्याच्या प्रवासातून मिळतो, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मर्यादित परिस्थितीतून वर येऊन यश मिळवणाऱ्या अजितची ही कथा आज अनेक तरुणांसाठी प्रेरणा बनली आहे.