Divorce Story : एक घटस्फोटात उद्योगपतीची ५५ व्या वर्षी कोट्यवधीची संपत्ती गेली

Published : Jul 24, 2026, 10:38 PM IST
Divorce Story : एक घटस्फोटात उद्योगपतीची ५५ व्या वर्षी कोट्यवधीची संपत्ती गेली

सार

भारतीय वंशाचे उद्योगपती हरीश डबासिया यांनी एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे की, घटस्फोटामुळे त्यांचं आर्थिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. ३५ वर्षांच्या संसारानंतर, वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांना आपली कोट्यवधींची संपत्ती पत्नी आणि मुलांसाठी सोडून आफ्रिकेत नव्याने आयुष्य सुरू करावं लागलं.

नैरोबी : एका घटस्फोटामुळे माझं आर्थिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने कमावलेली कोट्यवधींची संपत्ती मला गमवावी लागली, असा खुलासा भारतीय वंशाचे उद्योगपती हरीश डबासिया यांनी केला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की, घटस्फोटाने त्यांच्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम केला. 'द व्हॉइसेस पॉडकास्ट विथ अराफत' या कार्यक्रमात बोलताना हरीश यांनी सांगितलं की, घटस्फोटाच्या वेळी त्यांनी आपली सर्व मालमत्ता पत्नी आणि दोन मुलींच्या नावावर केली.

'मला सगळं सोडून द्यावं लागलं'

हरीश सांगतात की, त्यांचा जन्म भारतातील बांधकाम व्यावसायिकांच्या कुटुंबात झाला, पण त्यांचं बालपण केनियातील नैरोबीमध्ये गेलं. ते स्वतःला सहाव्या पिढीचे बिल्डर म्हणवतात, जणू काही सिमेंट आणि विटा त्यांच्या रक्तातच आहेत. वडिलांशी मतभेद झाल्यामुळे लहानपणीच वडिलांनी त्यांना यूकेला त्यांच्या काकांकडे राहायला पाठवलं. तिथेच त्यांनी यूकेमध्ये शिक्षण घेतलेल्या भारतीय वंशाच्या महिलेशी लग्न केलं. ३५ वर्षांचा संसार आणि कौटुंबिक व्यवसाय उत्तम सुरू होता. पण, घटस्फोटामुळे त्यांना आपली सर्व मालमत्ता आणि व्यवसाय पत्नी व दोन मुलींसाठी सोडून द्यावा लागला.

ते पुढे म्हणाले, "वयाच्या ५५ व्या वर्षी मी सगळं सोडून आफ्रिकेत परत आलो. आफ्रिकेत मी फक्त इमारती बांधल्या नाहीत, तर मी व्यवसाय उभे केले, माणसं जोडली." घटस्फोटानंतर आफ्रिकेत स्थायिक झाल्यामुळे आपल्याला आयुष्यात एक नवीन ध्येय मिळालं, असंही हरीश सांगतात. घटस्फोटानंतर मालमत्ता आणि आर्थिक जबाबदाऱ्यांच्या वाटणीमुळे त्यांच्या आयुष्याला मोठा धक्का बसला. या प्रक्रियेत त्यांना आपल्या कमाईचा मोठा हिस्सा द्यावा लागला, त्यामुळे त्यांना शून्यातून पुन्हा सुरुवात करावी लागली. "वयाच्या ५५ व्या वर्षी मला सगळं सोडून द्यावं लागलं," हे त्यांचं वाक्य सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

आर्थिक नुकसानीसोबत मानसिक धक्काही

घटस्फोटामुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर मोठा मानसिक धक्काही बसल्याचा दावा त्यांनी केला. संपत्ती गमावल्यानंतर पैशांपेक्षा मानसिक शांतता आणि वैयक्तिक आनंद जास्त महत्त्वाचा असतो, हे आपल्याला कळलं, असं ते म्हणाले. आयुष्यातील आव्हानांवर मात करून पुन्हा उभं राहण्याचा आपला अनुभवही त्यांनी या पॉडकास्टमध्ये सांगितला. हरीश डबासिया यांच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण घटस्फोटाच्या आर्थिक परिणामांबद्दल चर्चा करत आहेत, तर काहींच्या मते प्रत्येक घटस्फोटाची परिस्थिती वेगळी असते आणि एका व्यक्तीच्या अनुभवावरून सरसकट निष्कर्ष काढता येत नाही.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Wedding Expenses : लग्न खर्च | 1 दिवसात 20 लाखांचा चुराडा, तरुणीची पोस्ट व्हायरल
२५ जुलै २०२६: एकादशीचा योग, कुणाचे भाग्य उजळणार?