
घरच्या घरी बनवलेल्या साजूक तुपाची बातच काही और असते. बाजारात मिळणाऱ्या तुपापेक्षा याचा सुगंध आणि चव वेगळीच असते. तरीही, अनेकांना वाटतं की घरी तूप बनवण्यासाठी खूप मलाई लागते. पण हे खरं नाही. रोज दुधावरची थोडी थोडी साय साठवून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तूप बनवू शकता. यासाठी तुम्हाला कुठल्याही महागड्या यंत्राची गरज नाही. फक्त मलाई कशी साठवायची आणि लोणी कसं काढायचं याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असायला हवी.
आठवडाभर साठवलेली थोडीशीच मलाई असली, तरी एका खास ट्रिकचा वापर करून तुम्ही जास्त तूप मिळवू शकता आणि यात वाया जाणारं प्रमाणही कमी होतं. मलाई फ्रीझरमधून बाहेर काढा: तूप बनवण्यापूर्वी 3-4 तास मलाई फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा. मलाई एका पसरट भांड्यात काढा, त्यात एक चमचा साखर किंवा चिमूटभर खाण्याचा सोडा घाला आणि हातानेच एकाच दिशेने फक्त 2 ते 3 मिनिटे चांगलं फेटून घ्या. लोणी आणि ताक लगेच वेगळं होईल.
लोण्याचा गोळा तयार होताच त्यात थंड पाणी किंवा बर्फाचे तुकडे घाला. यामुळे लोणी घट्ट होऊन हाताला सहज लागतं आणि भांड्याला चिकटत नाही. लोणी 2-3 वेळा पाण्यात चांगलं धुवून घ्या आणि जाड बुडाच्या भांड्यात तापवायला ठेवा. यामुळे तूप करपणार नाही. तूप कढवण्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यावर पाण्याचे दोन थेंब शिंपडा. असं केल्याने तूप दाणेदार आणि खूप छान तयार होतं. तूप पूर्ण कढल्यावर त्यात धुतलेली शेवग्याची पानं किंवा एक विड्याचं पान टाका आणि गॅस बंद करा. यामुळे तुपाला अगदी गावरान सुगंध येतो आणि तूप दीर्घकाळ टिकतं.
तुपाला सोनेरी रंग आला आणि छान सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा. जास्त वेळ शिजवणं टाळा, कारण त्यामुळे तूप करपू शकतं आणि त्याला कडवट चव येऊ शकते. तयार झालेलं तूप थोडं थंड होऊ द्या. त्यानंतर, एका स्वच्छ, कोरड्या मलमलच्या कापडातून किंवा बारीक गाळणीने गाळून काचेच्या बरणीत भरून ठेवा. बरणीत अजिबात ओलसरपणा नाही याची खात्री करा. तूप पूर्णपणे थंड झाल्यावरच झाकण लावा. तूप काढण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि कोरडा चमचा वापरा.