
Deep Amavasya 2025 : आज 24 जुलैला दीप अमावस्या साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात या अमावस्येला फार महत्व आहे. खरंतर, अमावस्या ही तिथी अंधाराची, शांततेची आणि पितरांशी संबंधित मानली जाते. आपल्या हिंदू संस्कृतीत अमावस्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्यासाठी प्रार्थना, तर्पण व दीपदान करण्याची परंपरा आहे. दीप अमावस्येला लावलेला दिवा हा पितरांच्या आत्म्याला प्रकाशाचा मार्ग दाखवतो, अशी श्रद्धा आहे. या दिवशी लावलेला दिवा त्यांच्या समाधानासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी समर्पित केला जातो.
पितरांसाठी दिवा लावण्यामागील शास्र
अमावस्येला चंद्र दर्शन होत नाही, त्यामुळे रात्र पूर्ण अंधारी असते. शास्त्रानुसार, अमावस्येच्या रात्री पितरांचा लोकांशी संपर्क होण्याची शक्यता अधिक असते, कारण या दिवशी त्यांच्या आत्म्यांना पृथ्वीवर यायला 'ऊर्जा मार्ग' खुला असतो. यामुळेच त्यांना शांती, प्रकाश आणि श्रद्धा अर्पण करण्यासाठी दीपदान अत्यावश्यक मानले गेले आहे.
'गरुड पुराण' आणि 'धर्मसिंधु' सारख्या ग्रंथांमध्ये अमावास्येला पितृपूजेचं महत्व सांगितलं आहे. असे मानले जाते की, या दिवशी दिवा लावल्यानं पितरांच्या आत्म्याला प्रकाश मिळतो, अंध:कारातून मार्ग सापडतो आणि त्यांची तृप्ती होते.
कोणत्या दिशेला दिवा लावावा?
पितरांसाठी दिवा लावताना दिशा अत्यंत महत्त्वाची असते. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे पितरांसाठी दिवा दक्षिण दिशेला ठेवावा, असे धर्मशास्त्र सांगते. तसेच दक्षिण दिशा यमराजांची आणि मृत्यू लोकाचीही दिशा समजली जाते. त्यामुळे या दिशेला दिवा ठेवून आपण पितरांचे स्मरण, तर्पण व त्यांना प्रकाश अर्पण करत असतो. शास्त्रात सांगितले आहे की, घरातील दक्षिण कोपऱ्यात अथवा देव्हाऱ्याजवळ एक मातीचा दिवा ठेवून त्यात तूप किंवा तीळतेल घालावे, आणि दिवा लावताना "पितृदेवताभ्यः नमः" असे म्हणावे.
घरात सकारात्मक ऊर्जा आणि देवतांचा वास
दीप अमावस्येच्या दिवशी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावण्याची परंपरा आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा व देवतेचा वास राहतो, असे मानले जाते. पितरांचे आशीर्वाद लाभण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)