
Cleaning Hacks : आपल्याला वाटतं की घरातील सर्वात घाणेरडी जागा म्हणजे टॉयलेट सीट. पण अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की घरातील काही वस्तूंवर टॉयलेटपेक्षा अनेक पट अधिक बॅक्टेरिया वाढतात. आपण दररोज वापरणाऱ्या या वस्तूंवर आपल्यालाच नकळत जंतू चिटकतात आणि घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे कोणत्या 5 वस्तूंवर सर्वाधिक बॅक्टेरिया असतात आणि त्या कशा स्वच्छ ठेवाव्यात हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
मोबाईल फोन दिवसभर हातात असतो, खिशात जातो, टेबलवर ठेवला जातो, स्वयंपाकघरातही वापरला जातो. त्यामुळे त्यावर बॅक्टेरियांची वाढ होणे अत्यंत सामान्य आहे. एक अंदाजानुसार टॉयलेट सीटपेक्षा १० पट अधिक जंतू मोबाईलवर असू शकतात. हात धुतल्यानंतरही आपण फोन पुन्हा हाताळल्यामुळे जंतू पुन्हा शरीरावर येतात. त्यामुळे दिवसातून किमान एकदा अल्कोहोल बेस्ड वाइप्स किंवा मायक्रोफायबर कापडाने मोबाईल स्वच्छ करणे आवश्यक आहे.
स्वयंपाकघरातील स्पंज, धुण्याचे कापड किंवा स्क्रब्बरमध्ये ओलावा कायम राहतो. ही ओलसर जागा बॅक्टेरिया, फंगस आणि इ.कोली वाढण्यासाठी आदर्श असते. अभ्यासात आढळले आहे की किचन स्पंजवर टॉयलेट सीटच्या तुलनेत जवळपास २०० पट जास्त बॅक्टेरिया असू शकतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा स्पंज बदलणे, कापड गरम पाण्यात धुणे आणि सुकवणे महत्त्वाचे आहे.
रिमोट कंट्रोल ही अशी वस्तू आहे जी घरातील प्रत्येक जण दिवसभर हाताळतो. पण ती स्वच्छ करण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. सतत हाताळल्या जाणाऱ्यामुळे त्यावर सर्दी, फ्लू, आणि इतर बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात टिकतात. विशेषत: लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती असल्यास धोका वाढतो. आठवड्यातून किमान दोनदा डिसइन्फेक्टिंग वाइप्सने रिमोट स्वच्छ करणे गरजेचे आहे.
कीबोर्डवर अनेकदा जुनं अन्नकण, धूळ, त्वचेचे कण असे पदार्थ साचतात. आपण हात धुतले असले तरी कीबोर्डवर टाईप करताना जंतू त्यावर साचतात. त्यामुळे कीबोर्डवर टॉयलेटपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळणे सामान्य आहे. त्यासाठी दर 2-3 दिवसांनी कीबोर्ड क्लिनर स्प्रे किंवा कापडाने स्वच्छ करणे उत्तम.
टॉयलेट फ्लश करताना हवेत सूक्ष्म थेंब उडतात आणि हे थेंब जवळच्या वस्तूंवर बसतात. बाथरूममधील टूथब्रश होल्डरवर त्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया जमा होतात. टूथब्रशही ओलसर ठेवला जात असल्याने त्यात जंतू वाढतात. प्रत्येक आठवड्यात होल्डर गरम पाण्यात धुणे, आणि टूथब्रश 3 महिन्यांनी बदलणे आवश्यक आहे.