
Angarki Chaturthi 2026 : हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाची उपासना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दर महिन्यात येणारी चतुर्थी ही गणेश उपासनेसाठी खास असते. मात्र, जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. आज अंगारकी चतुर्थी साजरी केली जात असून मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. अशातच घरबसरल्या श्री सिद्धिविनायकाचे दर्शन लाईव्ह घ्या.
अंगारकी चतुर्थी का साजरी केली जाते, यामागे धार्मिक आणि पौराणिक कारणे आहेत. “अंगारक” हे मंगळ ग्रहाचे नाव असून मंगळवार हा गणपती बाप्पाचा प्रिय वार मानला जातो. या दिवशी केलेली गणेशपूजा विशेष फलदायी ठरते, अशी श्रद्धा आहे. पुराणांनुसार अंगारकी चतुर्थीच्या व्रताने सर्व अडचणी, संकटे आणि विघ्ने दूर होतात, तसेच सुख-समृद्धी, आरोग्य आणि यश प्राप्त होते. त्यामुळे अनेक भाविक या दिवशी उपवास करून विधीपूर्वक गणपतीची पूजा करतात.
अंगारकी चतुर्थीचे महत्त्व सामान्य चतुर्थीपेक्षा अधिक आहे. या दिवशी उपवास केल्यास नवग्रह दोष, मंगळ दोष आणि मानसिक तणाव कमी होतो, अशी मान्यता आहे. भक्त सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाचे ध्यान करतात, दुर्वा, मोदक अर्पण करतात आणि गणेश मंत्रांचा जप करतात. अनेक ठिकाणी विशेष अभिषेक, महाआरती आणि भजन-कीर्तनाचे आयोजन केले जाते. श्रद्धेनुसार या दिवशी गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात.
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. श्री सिद्धिविनायक हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक आहे. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने येथे विशेष पूजा, आरती आणि दर्शनाची व्यवस्था केली जाते. देशभरातून आणि परदेशातूनही भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतात. अनेक भाविक या दिवशी सिद्धिविनायक बाप्पाकडे नवस फेडण्यासाठी येतात.