आजकाल जवळपास प्रत्येक घरात एअर फ्रायर दिसतो. पण अनेकांना प्रश्न पडतो की, त्यात स्टीलची भांडी वापरणं सुरक्षित आहे का? आणि जर वापरली तर काय होऊ शकतं? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आजकाल कमी तेलात तळलेले पदार्थ आणि स्नॅक्स बनवण्यासाठी एअर फ्रायरचा वापर वाढला आहे. अनेकांना प्रश्न पडतो की यात स्टीलची भांडी वापरावी की नाही. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही एअर फ्रायरमध्ये स्टीलची भांडी नक्कीच वापरू शकता. एअर फ्रायर मायक्रोवेव्ह ओव्हनसारखा काम करत नाही, तर तो कन्व्हेक्शन ओव्हनप्रमाणे गरम हवेने पदार्थ शिजवतो. त्यामुळे चांगल्या दर्जाची स्टीलची भांडी किंवा बेकिंग ट्रे ही उष्णता सहज सहन करू शकतात. फक्त भांड्यांना प्लास्टिक, रबर किंवा लाकडी हँडल नसावेत याची खात्री करा. फक्त ओव्हन-सेफ आणि पूर्णपणे स्टीलची भांडी निवडणं महत्त्वाचं आहे.
23
ही काळजी घेणे आवश्यक
स्टीलची भांडी सुरक्षित असली तरी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये व्यवस्थित बसेल अशा लहान किंवा मध्यम आकाराच्या भांड्यांचाच वापर करा. भांडं खूप मोठं असेल तर बास्केटमधील गरम हवेचा प्रवाह (एअरफ्लो) अडथळा येतो आणि पदार्थ व्यवस्थित शिजत नाही. भांड्याच्या चारही बाजूंनी हवा खेळती राहील, याची खात्री करा. तसेच, भांड्यातील पदार्थ वरच्या हीटिंग कॉइलला चिकटणार नाही, याकडेही लक्ष द्या. ग्रेव्ही किंवा तेलकट पदार्थ बनवण्यासाठी लहान स्टीलची भांडी उत्तम पर्याय आहेत.
33
हे नियम लक्षात ठेवा
तुम्ही एअर फ्रायरमध्ये ॲल्युमिनियम फॉइल आणि पार्चमेंट पेपर वापरू शकता, पण ते मोकळे सोडू नका. हवेच्या वेगाने ते उडून हीटिंग एलिमेंटला चिकटल्यास आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यावर पदार्थांचे वजन ठेवा. काचेची भांडी वापरायची असल्यास फक्त 'ओव्हन-सेफ' असलेलीच वापरा. फ्रीजमधून काढलेली थंड काचेची भांडी थेट गरम एअर फ्रायरमध्ये ठेवल्यास तापमानातील बदलामुळे ती फुटू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, 'मायक्रोवेव्ह-सेफ' लिहिलेलं असलं तरी प्लास्टिक किंवा मेलामाइनची भांडी एअर फ्रायरमध्ये कधीही वापरू नका. जास्त उष्णतेमुळे ती वितळून अन्नात विषारी घटक मिसळू शकतात. हे सोपे नियम पाळल्यास तुम्ही एअर फ्रायर अधिक सुरक्षितपणे वापरू शकता.