
Low BP : कडक उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांना थकवा जाणवतोय. पण त्यासोबतच लो ब्लड प्रेशरची (Low BP) समस्याही वाढली आहे. शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) निर्माण झाल्यामुळे ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. अशा स्थितीत लोकांना चक्कर येणं, अशक्तपणा, अंधुक दिसणं आणि थकवा जाणवू शकतो. तुम्ही कुठे बाहेर जात असाल आणि अचानक रस्त्यात बीपी लो झाला, तर तुमच्याकडे काही गोष्टी असायला हव्यात, ज्या खाऊन किंवा पिऊन तुम्हाला लगेच आराम मिळू शकेल. चला, जाणून घेऊया असे कोणते उपाय आहेत, जे लो ब्लड प्रेशरमध्ये त्वरित आराम देतात.
आपल्या बॅगेत मिठाची एक लहान पुडी नक्की ठेवा. जेव्हाही तुम्हाला बीपी लो झाल्यासारखं वाटेल किंवा चक्कर येईल, तेव्हा एका ग्लास पाण्यात थोडं मीठ टाकून प्या. यामुळे ब्लड प्रेशर लवकर नॉर्मल व्हायला मदत होते. तुम्ही तुमच्या बॅगेत ORS किंवा ग्लुकोज ड्रिंकही ठेवू शकता. जर तुम्ही बाटलीत ORS चं द्रावण तयार करून सोबत ठेवलं, तर दिवसभर एनर्जी टिकून राहते आणि अशक्तपणाही दूर होतो.
मीठ, साखर आणि लिंबू एकत्र करून सरबत प्यायल्यानेही लो बीपीची लक्षणं कमी व्हायला मदत होते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, तर मीठ आणि साखर शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स करण्याचं काम करतात. त्यामुळे लो ब्लड प्रेशरचा त्रास कमी करण्यासाठी लिंबू सरबत नक्की प्या.
काकडी, टरबूज, संत्री यांसारखी पाणीदार फळं तुम्ही खाऊ शकता. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता तर दूर होतेच, पण शरीराला थंडावाही मिळतो. म्हणून उन्हाळ्यात भरपूर पाणी असलेली फळं रोज खा.
हे फार कमी लोकांना माहीत आहे, पण चहा किंवा कॉफी प्यायल्यानेही लो ब्लड प्रेशर वाढण्यास मदत होते आणि शरीराला लगेच आराम मिळतो. तुम्ही तुमच्या बॅगेत भाजलेले चणे, शेंगदाणे किंवा खारट बिस्किटं ठेवू शकता. याने शरीराला लगेच ऊर्जा मिळते आणि लो ब्लड प्रेशर नॉर्मल होतो.