अमरावती: आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका महिलेला पार्सलमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही भयंकर घटना पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उंडी मंडळातील येन्दगंडी गावात घडली.
नागा तुलसी नावाच्या महिलेने घर बांधण्यासाठी आर्थिक मदतीसाठी क्षत्रिय सेवा समितीकडे अर्ज केला होता. समितीकडून महिलेला टाईल्स पाठवण्यात आल्या होत्या. महिलेने पुन्हा घर बांधणीसाठी मदतीची विनंती केली. समितीकडून विजेचे साहित्य पुरवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. व्हॉट्सअॅपद्वारे महिलेला लाईट्स, फॅन्स आणि स्विचेस यांसारखी सामग्री दिली जाईल, असा मेसेज पाठवण्यात आला होता.
गुरुवारी रात्री एक व्यक्ती महिलेच्या घरी पार्सल घेऊन आला आणि त्यात विजेचे साहित्य असल्याचे सांगून तिथून निघून गेला. तुलसीने नंतर पार्सल उघडले आणि त्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे तिला धक्काच बसला. तिच्या कुटुंबीयांमध्येही घबराट निर्माण झाली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. जिल्हा पोलिस अधीक्षक अदनान नईम अस्मी यांनीही गावाला भेट दिली आणि प्रकरणाचा तपास केला.
पार्सलमध्ये एक पत्रही सापडले, ज्यामध्ये १.३० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती.
पोलिस पार्सल पोहोचवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी क्षत्रिय सेवा समितीच्या प्रतिनिधींनाही चौकशीसाठी बोलावले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेह सुमारे ४५ वर्षीय पुरुषाचा आहे. त्या व्यक्तीचा मृत्यू ४-५ दिवसांपूर्वी झाल्याचा संशय पोलिसांना आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या व्यक्तीची हत्या झाली आहे का, हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून, पोलिस आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी करत आहेत.
आणखी वाचा-
गर्भवती पत्नीची हत्या करून आम्लात टाकणाऱ्याला २१ वर्षांचा तुरुंगवास