
Weather Update : मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत असताना, काही ठिकाणी अजूनही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. मोंथा चक्रीवादळामुळे पावसाची सुरुवात झाली होती, मात्र आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही पाऊस थांबायचं नाव घेत नाही. राज्यातील काही भागांत गारठा निर्माण झाला असून जेऊर आणि धुळ्यात तापमान 10 अंशांच्या खाली गेले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 2 ते 3 दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काही राज्यांमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. म्हणजेच देशावर सध्या डबल संकट आहे — कुठे पाऊस तर कुठे गारठा!
10 नोव्हेंबर रोजी केरळमध्ये आणि 12-13 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. पुढील 5 दिवसांत या भागांतील तापमान 4 ते 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातदेखील थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने घसरणार असल्याचे IMDने सांगितले. ईशान्य भारतातही पुढील 3 दिवसांत तापमानात घट होणार असून धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल झाला आहे. महाबळेश्वरपेक्षा जळगावमध्ये तापमानाचा पारा अधिक खाली गेला असून थंडीमुळे हुडहुडी वाढली आहे. काही भागांत धुक्याची चादर पसरू लागली आहे.
हवामानातील या बदलामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा यांसारख्या पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईपर्यंत जाणवत आहे.
रविवारी मुंबईत किमान तापमान 19 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे या मोसमातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शुक्रवारपर्यंत तापमान खाली राहण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यानंतर साधारणपणे ऑक्टोबर हिटचा तडाखा बसतो, मात्र यावर्षी बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पाऊस सुरू राहिला. त्यामुळे ऑक्टोबर हिट टळला आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच गारव्याचा अनुभव मिळू लागला आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात पुढील आठवडाभर थंड हवामान कायम राहील अशी शक्यता आहे.