Vithya Ramraj: पीटी उषाचा ४२ वर्षांचा रेकॉर्ड मोडला, विथ्याने जिंकलं कांस्य!

vivek panmand   | CMS
Published : Sep 30, 2026, 06:36 PM IST
Vithya Ramraj: पीटी उषाचा ४२ वर्षांचा रेकॉर्ड मोडला, विथ्याने जिंकलं कांस्य!

सार

तमिळनाडूच्या विथ्या रामराजने भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये नवा इतिहास रचलाय. तिने पीटी उषा यांचा तब्बल ४२ वर्षे अबाधित असलेला नॅशनल रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झालीये. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर हर्डल्स (अडथळ्यांची शर्यत) प्रकारात तमिळनाडूच्या २८ वर्षीय विथ्या रामराजने कांस्यपदक जिंकून कमाल केलीये. एवढंच नाही, तर तिने अ‍ॅथलेटिक्समधील दिग्गज पीटी उषा यांचा ४२ वर्षांचा जुना नॅशनल रेकॉर्डही मोडलाय. या थरारक फायनलमध्ये विथ्याने ५४.७५ सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय.

पीटी उषा यांचा रेकॉर्ड मोडला

जपानच्या नागोया शहरातील मिझुहो पार्क अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर झालेली ही शर्यत सुरुवातीपासूनच खूप चुरशीची होती. विथ्याने जेव्हा फिनिश लाईन पार केली, तेव्हा घड्याळात ५४.७५ सेकंद वेळ नोंदवली गेली. ही तिची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी तर आहेच, पण भारतीय क्रीडा इतिहासातील हा एक नवा नॅशनल रेकॉर्ड ठरलाय. याआधी 'पय्योली एक्सप्रेस' पीटी उषा यांनी १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये ५५.४२ सेकंदात शर्यत पूर्ण करून रेकॉर्ड बनवला होता. गेल्या चाळीस वर्षांत एकाही भारतीय महिला खेळाडूला हा रेकॉर्ड मोडता आला नव्हता. पण विथ्याने ही वेळ ०.६७ सेकंदांनी कमी करत ट्रॅकवर एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय.

भारतीय अ‍ॅथलेटिक्सला मिळाली नवी उषा

कोईम्बतूरची राहणारी विथ्या रामराज उषा यांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कठोर मेहनत घेत होती. २०२३ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पात्रता फेरीत विथ्याने पीटी उषा यांच्या ५५.४२ सेकंदांच्या वेळेची बरोबरी केली होती. तेव्हा तिने रेकॉर्डशी बरोबरी केली, पण तो मोडता आला नव्हता. मात्र, २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ती एका स्पष्ट ध्येयानेच मैदानात उतरली. यावेळी तिने फक्त बरोबरी केली नाही, तर हा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला.

दुसरं कांस्यपदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर हर्डल्समध्ये विथ्याचं हे सलग दुसरं कांस्यपदक आहे. याआधीच्या स्पर्धेतही तिने कांस्य जिंकलं होतं. याशिवाय, सध्या सुरू असलेल्या २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिक्स्ड ४x४०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर, या स्पर्धेतलं तिचं हे दुसरं पदक आहे.

हा ऐतिहासिक क्षण भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्षा पीटी उषा यांनी स्वतः स्टेडियममध्ये बसून पाहिला. चाळीस वर्षांपूर्वीचा आपलाच रेकॉर्ड विथ्याने मोडल्याचं पाहून उषा यांनी तिला मिठी मारली आणि तिचं अभिनंदन केलं. विथ्याच्या या ऐतिहासिक यशामुळे भारतीय महिला अ‍ॅथलेटिक्सला एक नवी ऊर्जा मिळालीये. याच फायनलमध्ये भारताची आणखी एक गुणवान धावपटू अनु राघवनने ५५.८८ सेकंदात शर्यत पूर्ण करत पाचवा क्रमांक पटकावला. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ ठरलीये.

नव्या पर्वाची सुरुवात

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर हर्डल्समध्ये भारताचं हे सलग तिसरं पदक आहे. याआधी २०१८ च्या जकार्ता स्पर्धेत अनु राघवनने कांस्यपदक जिंकून दिलं होतं. एकंदरीत, तमिळनाडूच्या कोईम्बतूरमधून आलेल्या विथ्या रामराजचं हे यश म्हणजे फक्त एक रेकॉर्ड किंवा पदक नाहीये; तर ही भारतीय अ‍ॅथलेटिक्समधील एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baghpat Plant Theft: पोलिसांचा स्टिकर असलेली कार थांबवली आणि हायवेवरचं झाडच चोरून नेलं!
Swiggy Instamart Rotten Eggs : लोकांच्या आरोग्याशी खेळतायत का ऑनलाइन डिलिव्हरी अ‍ॅप्स?