
गुवाहाटी : आसामच्या दिब्रुगडमध्ये एका व्यक्तीने ब्रह्मपुत्रा नदीत दूध अर्पण केलं. पण त्यानंतर त्याने रिकामं पाकीट थेट पाण्यात फेकून दिलं. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, पर्यावरण रक्षणावरून आता ऑनलाइन वाद सुरू झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती धार्मिक विधी करताना दिसत आहे. पण दूध अर्पण केल्यानंतर कचराकुंडीत पाकीट टाकण्याऐवजी त्याने ते नदीतच भिरकावून दिलं.
बंगळुरूचे रहिवासी नवीन रेड्डी यांनी हा व्हिडिओ 'एक्स' (X) वर शेअर केला आहे. पवित्र नदीत दूध अर्पण करतानाच तिच्या प्रदूषणात भर घालण्याच्या या कृतीवर त्यांनी संताप व्यक्त केला. धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरणाचं भान या दोन्ही गोष्टी एकत्र असायला हव्यात, असं रेड्डी यांनी म्हटलं आहे.
"तुमच्या श्रद्धांचा आदर करा, पण निसर्गाचाही आदर करायला शिका. ब्रह्मपुत्रा नदी स्वच्छ ठेवा!" असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
📍ब्रह्मपुत्रा नदी, दिब्रुगड, आसाम
धार्मिक विधींचा भाग म्हणून ब्रह्मपुत्रा नदीत दूध अर्पण करणं हा श्रद्धेचा भाग आहे, पण त्यानंतर दुधाची रिकामी पाकिटे नदीत फेकणं अत्यंत चुकीचं आहे. तुमच्या श्रद्धांचा आदर करा, पण निसर्गाचाही आदर करा.
ब्रह्मपुत्रा स्वच्छ ठेवा! 🙏🌊
ता.क. - मला नदीकिनाऱ्यावर कुठेही कचराकुंडी दिसली नाही.
@dibrugarhpolice @mygovassam @CMOfficeAssam @assampolice
— Naveen Reddy (@navin_ankampali) October 31, 2026
नदीकिनाऱ्यावर कचरा टाकण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याचंही रेड्डी यांनी निदर्शनास आणून दिलं. या संपूर्ण परिसरात त्यांना एकही कचराकुंडी दिसली नाही.
मध्य प्रदेशात बिट्टू तबाही या तरुणाने नुकतीच नदी स्वच्छतेची मोहीम राबवली होती. त्यानंतर नदी प्रदूषण आणि स्वच्छतेबाबत लोकांच्या उदासीनतेवर बरीच चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ही नवीन घटना समोर आली आहे.
अजनार नदी स्वच्छ करण्याच्या मोहिमेदरम्यान बिट्टूने अनेक व्हिडिओ शेअर केले होते. तो नदीतला कचरा काढत असतानाच, लोक त्याच्या अगदी जवळून कचऱ्याच्या पिशव्या थेट पाण्यात फेकत असल्याचं त्या व्हिडिओंमध्ये दिसलं होतं.