उत्तराखंड बस अपघात: २८ प्रवाशांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

उत्तराखंडमधील अल्मोडा येथे एक बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत २८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जखमींना वाचवण्याचे काम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

डेहराडून: उत्तराखंडमधील अल्मोडा जवळील मार्चुला येथे एक बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत २८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी प्रवास करत होते. यातील २८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी स्थानिक पोलिसांनी केली आहे. बस अपघात झाल्याची माहिती मिळताच अल्मोडाचे एसपी तीन बचाव पथकांसह घटनास्थळी दाखल झाले.

काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून, जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. अल्मोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्चुला येथे हा अपघात झाला असल्याची माहिती एसडीएम संजय कुमार यांनी दिली.

बस दरीत कोसळताच घटनास्थळीच सात जणांचा मृत्यू झाला. गडवाल येथून कुमाऊँला जात असताना मार्चुला येथे बस दरीत कोसळली. बसमध्ये एकूण ४० प्रवासी प्रवास करत होते. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे, असे जिल्हा दंडाधिकारी आलोक कुमार पांडे यांनी सांगितले.

अल्मोडा जिल्ह्यातील मार्चुला येथे झालेल्या दुर्दैवी बस अपघातात प्रवाशांच्या मृत्युमुळे अत्यंत दुःखाची बातमी समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचाव कार्य जलद गतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफची पथके जखमींना बाहेर काढून जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यासाठी जलद काम करत आहेत. गरज पडल्यास गंभीर जखमींना एअरलिफ्ट करण्याचे निर्देशही दिले आहेत, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी म्हणाले.

Share this article