UP : ट्रॅक्टर-ट्रॉली तलावामध्ये उलटून घडली मोठी दुर्घटना; 22 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Uttar Pradesh Accident : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. तलावामध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली उलटल्याने 22 जणांचा मृत्यू झाला. तर 15हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे म्हटले जात आहे

Harshada Shirsekar | Published : Feb 24, 2024 8:54 AM IST / Updated: Feb 24 2024, 02:49 PM IST

Uttar Pradesh Accident News : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी (25 फेब्रुवारी) दुपारी कासगंज येथे झालेल्या मोठ्या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तलावामध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली उलटल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये 15 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचेही वृत्त समोर आले आहे. 

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. तलावामध्ये पडलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी बचावकार्य तसेच शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

कासगंजमध्ये घडलेला अपघात इतका भीषण होता की लोकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संधीच मिळाली नाही. काही क्षणांमध्येच होत्याचे नव्हते झाले. ट्रॅक्टर ट्रॉली तलावामध्ये उलटली आणि प्रवासी तलावामध्ये बुडाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोधही सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॉलीमध्ये जवळपास 40 लोक होते. मृत पावलेले सर्वजण जायथरा गावचे रहिवासी आहेत. सध्या घटनास्थळी बुलडोझरच्या मदतीने बचावकार्य करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला शोक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, कासगंज जिल्ह्यातील रस्ते अपघातामध्ये झालेली जीवितहानीची घटना अतिशय हृदयद्रावक आहे. सर्व जखमींवर योग्य तसेच मोफत उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मृत पावलेल्या लोकांच्या आत्म्यास शांती लाभो आणि जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी प्रार्थना मी भगवान रामाकडे करतो.

कासगंजमधील दुर्घटनेमागील कारण

दुर्घटनास्थळी अजून गोंधळ तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातग्रस्त वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच ट्रॅक्टरमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक प्रवासी होते आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण देखील सुटल्याचे म्हटले जात आहे. यामुळे ट्रॅक्टर तलावामध्ये उलटला व मोठा अपघात घडला.

कासगंजच्या रियावगंज पतियाळी रोडवरील गढई गावाजवळ हा अपघात झाला. ट्रॉलीतून प्रवास करणारे लोक माघी पौर्णिमेनिमित्त कादरगंज घाटावर गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जात होते, अशी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा

PM Narendra Modi : वाराणसीत पोहोचताच PM नरेंद्र मोदींनी शिवपूर-फुलवारिया-लहारतारा मार्गाची केली पाहणी

Manohar Joshi : राजकारण, समाजकारणातील सर्वांचे 'सर', सुसंस्कृत-व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला - CM एकनाथ शिंदे

BMC Hospital : रडणे थांबवण्यासाठी नवजात बाळाच्या तोंडाला नर्सने चिकटपट्टी लावल्याचे प्रकरण, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Share this article