
मुंबई : उबर, ओला आणि इतर राइड-हेलिंग अॅपवर कॅब बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन अॅग्रीगेटर्सना कॅब बुकिंगपूर्वी प्रवाशांना ‘टिप’ देण्याचा पर्याय तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत. कॅब लवकर मिळावी किंवा ड्रायव्हरकडून बुकिंग स्वीकारले जाण्याची शक्यता वाढावी, यासाठी प्रवाशांनी अतिरिक्त पैसे द्यावेत असा मेसेज आधी दाखवला जायचा. मात्र आता कोणताही मेसेज अॅपवर दाखवता येणार नाहीये.
कॅब बुक करताना काही अॅपवर ‘Advance Tip’, ‘Choose an Add-on’ किंवा ‘Improve your chances of quicker ride confirmation’असे पर्याय दाखवले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.यामुळे प्रवाशांना टिप दिल्यास कॅबचे बुकिंग लवकर कन्फर्म होईल, ड्रायव्हर राइड स्वीकारेल किंवा चांगली सेवा मिळेल असा समज निर्माण व्हायचा. याचीच दखल घेत केंद्र सरकारने अॅग्रीगेटर्सना अशा सुविधा हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
मोटर व्हेहिकल अॅग्रीगेटर गाइडलाइन्स, 2025 नुसार, राइड पूर्ण होण्यापूर्वी टिप किंवा अतिरिक्त पेमेंटचा असा पर्याय देता येणार नाहीये. जेणेकरुन अतिरिक्त पैसे दिल्यास सेवा मिळण्याची शक्यता वाढेल असे प्रवाशांना वाटू शकते हा भ्रम दूर होणार आहे. यामध्ये ड्रायव्हरने राइड स्वीकारणे, बुकिंग लवकर कन्फर्म होणे, कोणता ड्रायव्हर मिळणे किंवा कॅबसाठी किती वेळ वाट पाहावी लागणार या गोष्टींचा समावेश आहे.
सरकारने टिप देण्यावर बंदी घातलेली नाही. प्रवाशांना राइड पूर्ण झाल्यानंतर ड्रायव्हरला आपल्या इच्छेनुसार टिप देता येईल.मोटर व्हेहिकल अॅग्रीगेटर गाइडलाइन्स, 2025 मधील नियम 14.15 नुसार, टिप पूर्णपणे ऑप्शनल असावी आणि राइड पूर्ण झाल्यानंतरच त्याचा पर्याय उपलब्ध करून देता येईल. तसेच प्रवाशाने दिलेली संपूर्ण टिप ड्रायव्हरलाच मिळणे आवश्यक आहे. अॅग्रीगेटर त्यातून कोणतीही रक्कम कापू शकत नाही.
राइड बुकिंगच्या प्रक्रियेदरम्यान टिप किंवा अतिरिक्त पेमेंटचे पर्याय दाखवले जात असल्याच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) देखील राइड-हेलिंग प्लॅटफॉर्मना अशी पद्धत बंद करण्याचे निर्देश दिले होते.