
धर्माच्या नावाखाली चालवलेल्या मठात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या लोकेश्वर स्वामीच्या विकृत कृत्याने संपूर्ण कर्नाटक हादरले आहे. मेखळी गावातील राम मंदिर मठाचा प्रमुख असलेल्या या तथाकथित स्वामीने, भक्तीच्या आडून अधर्माचा मार्ग स्वीकारत, एका निष्पाप मुलीवर अत्याचार केले आहेत.
लोकेश्वर शबन्ना भांगी, उर्फ लोकेश्वर स्वामी, याने चार वर्षांपूर्वी मेखळी गावात १० एकर सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे राम मंदिर मठाची स्थापना केली. या मठात तलवारी, कोयते, जांबिया यांसारखी हत्यारे आढळून आली, तसेच तो मटक्याचे नंबर आणि जुगाराशी संबंधित माहिती भक्तांना पुरवित असल्याचे उघड झाले आहे.
१३ मे रोजी, पीडित मुलगी आपल्या मामाच्या गावातून परत येत असताना, स्वामीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये घेतले. त्यानंतर, तिला रायचूर आणि बागलकोट येथील लॉजमध्ये नेऊन तीन दिवस अत्याचार केला. १६ मे रोजी, तिला महालिंगपूर बसस्थानकात सोडून दिले. A
गावकऱ्यांनी स्वामीच्या विकृत वर्तनाबद्दल पूर्वीही तक्रारी केल्या होत्या, परंतु पोलिसांनी दुर्लक्ष केले. या घटनेनंतर, पोलिसांनी लोकेश्वर स्वामीला अटक केली आणि त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.
या घटनेने धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या मठांमध्ये होत असलेल्या अनैतिक कृत्यांवर प्रकाश टाकला आहे. धर्मगुरूंच्या मुखवट्याखाली लपलेल्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना उघड करण्याची आणि कठोर शिक्षा देण्याची गरज आहे.