
एका आयटी इंजिनिअरने आपल्या वडिलांना १८ हजार रुपयांच्या फसवणुकीपासून कसं वाचवलं, याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका भामट्याने स्वतःला स्वयंपाकी (कुक) भासवून हा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. आपण ट्रेनमधून गॅस सिलिंडर घेऊन जात असताना पोलिसांनी पकडल्याचा बनाव त्याने रचला. तसंच, तीन वर्षांची जेल टाळायची असेल तर तातडीने पैसे पाठवा, अशी मागणी त्याने केली.
आनंद मुरुगन या तरुणाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे हा सगळा प्रकार सांगितला. त्यांच्या वडिलांचं एक डोशाचं दुकान आहे. त्यांनी कोलकात्याहून एका स्वयंपाक्याला कामासाठी बोलावून घेतलं होतं. पण, कामासाठी माणसाला बोलावण्याचा हा नेहमीचा व्यवहार अचानक पैशांच्या मागणीत बदलला.
मुरुगन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्वयंपाकी अस्खलित तमिळ बोलायचा. तो मूळचा आसाममधील गुवाहाटीचा असल्याचं त्याने सांगितलं होतं. कोलकात्याला जाण्यापूर्वी तो चेन्नईत राहत होता, असाही त्याचा दावा होता.
"फसवणुकीचा नवा प्रकार. माझ्या वडिलांचं डोशाचं दुकान आहे. त्यांनी एका स्वयंपाक्याला कामावर ठेवलं होतं," असं मुरुगन यांनी एक्स (X) वर पोस्ट करत लिहिलं. ते पुढे म्हणाले, "त्या स्वयंपाक्याने ट्रेनमधून फोन केल्याचं भासवलं. तो म्हणाला की, तो सोबत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर घेऊन येत होता आणि त्याला एका पोलीस अधिकाऱ्याने पकडलं आहे. पोलिसांनी १८ हजार रुपयांची मागणी केली असून, पैसे न दिल्यास ३ वर्षांची शिक्षा होईल, अशी धमकी दिली आहे."
फसवणुकीचा नवा प्रकार. माझ्या वडिलांचं डोशाचं दुकान आहे. त्यांनी बिहार मधून एका स्वयंपाक्याला कामावर ठेवलं आणि ट्रेनच्या तिकिटासाठी पैसे पाठवले. त्या स्वयंपाक्याने ट्रेनमधून फोन केल्याचं भासवलं आणि म्हणाला की तो सोबत गॅस सिलिंडर घेऊन येत होता आणि त्याला एका पोलीस अधिकाऱ्याने पकडलं आहे. पोलीस १८ हजार रुपये मागत आहेत, नाहीतर ३ वर्षांची जेल होईल. त्याने व्हिडीओ कॉल केला आणि त्यात एक पोलीस अधिकारी, गॅस सिलिंडर आणि आजूबाजूला गर्दी दाखवली. माझे वडील याला भुलले आणि त्यांनी मला पैसे पाठवायला सांगितले. सुदैवाने मी त्यांना समजावून सांगितलं की हा एक स्कॅम आहे.
— आनंद मुरुगन (@wordsandforms) १३ ऑक्टोबर २०२६
या भामट्याने आपली कहाणी खरी वाटावी म्हणून आणखी एक पाऊल पुढे टाकलं. मुरुगन यांच्या वडिलांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना त्याने एक पोलीस अधिकारी, गॅस सिलिंडर आणि आजूबाजूला जमलेली गर्दी दाखवली. आपण खरंच मोठ्या अडचणीत सापडलो आहोत, हे भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता.
"त्याने व्हिडीओ कॉल केला आणि त्यात पोलीस अधिकारी, गॅस सिलिंडर आणि गर्दी दाखवली," असं मुरुगन म्हणाले. "माझे वडील याला भुलले आणि त्यांनी मला पैसे पाठवायला सांगितले. सुदैवाने, मी त्यांना समजावून सांगितलं की हा एक स्कॅम आहे."
मुरुगन यांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे त्यांच्या वडिलांचे पैसे वाचले. त्यांची ही पोस्ट आता इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे. स्वयंपाकी किंवा शेफ असल्याचं भासवून लोकांची कशी फसवणूक केली जाते, याबद्दल अनेक युजर्स आता इतरांना सावध करत आहेत.
सोशल मीडियावर अनेक युजर्सनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. कामाच्या बहाण्याने येणारे हे लोक प्रवासासाठी किंवा इतर खर्चासाठी कसे पैसे उकळतात, हे त्यांनी सांगितलं.
एका युजरने असाच अनुभव सांगताना लिहिलं: "आम्ही ट्रेनच्या तिकिटासाठी २००० रुपये दिले होते. त्यानंतर तो म्हणाला की त्याचा फोन दुरुस्त करायचा आहे आणि त्यासाठी आणखी ६००० रुपये लागतील. पैसे दिले नाहीत तर तो येणार नाही, अशी धमकी त्याने दिली."
दुसऱ्या एका युजरने हा प्रकार जुनाच असल्याचं सांगत सावध केलं: "हा खूप जुना स्कॅम आहे. अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. सावध राहा, सुरक्षित राहा."
तिसऱ्या युजरने या भामट्यावर संताप व्यक्त करत लिहिलं: "किती मोठा फसव्या आहे हा. ज्या माणसाने त्याला काम दिलं, त्यालाच त्याने फसवण्याचा प्रयत्न केला. अनेकांना काम मिळत नाहीये, आणि हा असा गंडा घालतोय."
चौथ्या युजरने सांगितलं, “शेफ लोकांनी ट्रेनच्या प्रवासासाठी पैसे मागणं हाच मुळात एक कॉमन स्कॅम आहे. ते तुम्हाला आधार कार्ड आणि लोकेशन पाठवून प्रवासाचा खर्च मागतात. पैसे मिळाले की सगळ्या प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक करतात आणि अचानक त्यांचा नंबर बंद लागतो.”