तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट! 9 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Tamil Nadu : तामिळनाडूतील विरुधुनगर येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की कारखान्यासोबतच जवळील चार घरेही अक्षरशः कोसळली. 

Harshada Shirsekar | Published : Feb 17, 2024 11:43 AM IST / Updated: Feb 17 2024, 05:19 PM IST

Tamil Nadu : तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यामध्ये शनिवारी (17 फेब्रुवारी) फटाक्यांच्या कारखान्यामध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. 

या स्फोटामध्ये कारखान्यासोबतच परिसरातील चार घरांचंही मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली अडकल्याचे आढळले.

स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज कित्येक किलोमीटर दूरवर ऐकू आला. स्फोटामुळे कारखान्यासह आसपासची चार घरे उद्ध्वस्त देखील झाली. वेम्बकोट्टई परिसरामध्ये असलेल्या या कारखान्याच्या मालकाचे नाव विजय असे आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही तातडीने येथे दाखल झाल्या. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सात जणांचा जागीच झाला मृत्यू

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेमध्ये सात जणांचा जागीच तर अन्य दोघांचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला. कारखान्यातील केमिकल मिक्सिंग रूममध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती प्राथमिक तपासाद्वारे समोर आली आहे. केमिकल रूममध्ये लागलेली आग वेगाने पसरली, त्यामुळे कारखान्यातील फटाक्यांचा स्फोट झाला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. वर्ष 2023च्या सुरुवातीस तामिळनाडूतील कृष्णगिरी येथेही फटाक्यांच्या कारखान्यामध्ये स्फोट झाला होता. यामध्ये तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता .

आणखी वाचा

भारतीयांशी लग्न करणाऱ्या NRIसाठी कठोर नियम, या कारणासाठी विधि आयोगाने उचलले मोठे पाऊल

French Journalist : 'भारत देश सोडण्यास भाग पाडले' OCI कार्डच्या वादानंतर फ्रेंच महिला पत्रकाराची प्रतिक्रिया

Suhani Bhatnagar : 'दंगल' फेम सुहानी भटनागरचे निधन, वयाच्या 19व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Share this article