
Students Protest Transfer of Teacher Who Funded Their Flight Trip : नुकतेच आपल्या स्वखर्चाने मुलांना विमानाने सहलीला नेऊन चर्चेत आलेले कर्नाटकातील कोप्पळ तालुक्यातील बहादूरबंडी सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बीरप्पा अंडागी यांच्या बदलीमुळे विद्यार्थी भावूक झाले आहेत. मुख्याध्यापकांना जाऊ देणार नाही, असे म्हणत त्यांनी शाळेचे गेट बंद करून आंदोलनही केले. बहादूरबंडी गावातील शाळेत ते गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची बदली झाल्याने आंदोलन सुरू असून, विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनीही साथ दिली आहे. शाळेचे गेट बंद करून 'आम्हाला बीरप्पा सरच हवेत' अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून शिक्षकही भावूक झाले.
तालुक्यातील बहादूरबंडी सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आणि दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष बीरप्पा अंडागी यांनी नुकतेच आपल्या शाळेतील २४ विद्यार्थ्यांना स्वखर्चाने विमानाने सहलीला नेल्याबद्दल राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने त्यांचे अभिनंदन केले होते.
याबद्दल अभिनंदन पत्र लिहून राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शशिधर कोसंबे यांनी मुख्याध्यापक बीरप्पा अंडागी यांच्या कार्याचे कौतुक केले होते. बीरप्पा अंडागी यांनी आपल्या शाळेतील २४ मुलांना स्वखर्चाने जिंदाल विमानतळावरून विमानाने बंगळूरुला नेले आणि तेथे दोन दिवस बंगळुरुमधील विधानसौंध, लालबागसह विविध पर्यटन स्थळे दाखवली होती.
याविषयी माध्यमांनी वृत्त दिले होते. याची दखल घेऊन बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कोसंबे यांनी मुख्याध्यापक बीरप्पा अंडागी यांच्या कार्याचे कौतुक करत अभिनंदन पत्र पाठवले होते.
बीरप्पा अंडागी यांनी विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी देण्यासाठी गेल्या एप्रिलमध्ये ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा घेतली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्या २४ विद्यार्थ्यांना विमानाने बंगळूरु सहलीला नेण्यात आले. या परीक्षेला २२० विद्यार्थी बसले होते.
बीरप्पा अंडागी यांनी ३.५ लाख रुपये खर्च करून चार्टर्ड विमान बुक केले होते. त्यानंतर, इतर खर्चासह एकूण ५ लाख रुपये खर्च येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले होते. शाळेतील मुले, शिक्षक, शाळा विकास समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि माध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांसह एकूण ४० जणांना त्यांनी विमानाने बंगळूरला नेले होते. बीरप्पा यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले होते.