
इंदूरमधील पिण्याच्या पाण्याच्या दुर्घटनेत वृद्धांपासून ते सहा महिन्यांच्या बाळापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुर्घटनेमुळे भागीरथपुरातील प्रत्येक घर मृत्यूच्या भीतीने ग्रासले आहे. अशा परिस्थितीत मृतांच्या आकड्यांबाबत मध्य प्रदेश सरकार अजूनही लपवाछपवी करत आहे.
अव्यांश साहू या अवघ्या सहा महिन्यांच्या बालकाचाही यात मृत्यू झाला आहे. अव्यांश हा तब्बल १० वर्षांच्या प्रार्थना आणि प्रतीक्षेनंतर जन्मला होता. त्याला आईच्या दुधासोबत पॅकेटच्या दुधात पाणी मिसळून दिले जात होते. मात्र, दूध पातळ करण्यासाठी वापरलेले पाणी दूषित असेल, याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. दूध प्यायल्यानंतर आईच्या मांडीवर खेळत असताना अव्यांशला अचानक उलट्या होऊ लागल्या, त्याची प्रकृती खूपच खालावली. २ दिवस रुग्णालयात उपचार करूनही त्याचा जीव वाचू शकला नाही आणि २९ डिसेंबर रोजी अवघ्या सहा महिन्यांच्या अव्यांशचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारने जाहीर केलेली दोन लाख रुपयांची मदत कुटुंबाने नाकारली. 'पैशांनी आमचा मुलगा परत येईल का?' असा सवाल अव्यांशची आजी कृष्णा साहू विचारत आहे.
पिण्याच्या पाण्याऐवजी दूषित पाणी येत होते, हे कळले नाही, असे अव्यांशचे वडीलही सांगत आहेत. भागीरथपुरा परिसरातील दोन हजारांहून अधिक लोकांना गेल्या १० दिवसांत उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याचे स्थानिक सांगत आहेत. यापैकी २७२ जणांना प्रकृती गंभीर झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. आतापर्यंत केवळ ७१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ३२ जण अजूनही अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहेत.
गेल्या २ महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या पाईपमधून दूषित पाणी येत असल्याची तक्रार स्थानिकांनी वारंवार केली होती. पण कोणीही ऐकले नाही. एवढे होऊनही मध्य प्रदेश सरकार मृतांचा नेमका आकडा स्पष्टपणे सांगत नाहीये. कालपर्यंत अधिकाऱ्यांनी केवळ ४ मृत्यूंची पुष्टी केली होती. मात्र, आता सरकार ९ मृत्यूंची पुष्टी करत आहे. आतापर्यंत किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एकंदरितच दूषित पाणी प्यायल्यामुळे भागीरथपुरा नावाचा संपूर्ण परिसर सध्या स्तब्ध झाला आहे. प्रत्येक घरात कोणत्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.