
आठवीत शिकणाऱ्या एका मुलाला गेमिंगचं वेड चांगलंच महागात पडलं आहे. त्याने वडिलांकडून अभ्यासासाठी मोबाईल घेतला, पण त्यावर Roblox नावाच्या गेममधील व्हर्च्युअल चलन खरेदी करण्यासाठी तब्बल ४२,००० रुपये खर्च केले. ही घटना मुलाच्या मोठ्या भावाने Reddit वर एका पोस्टमधून समोर आणली. "भावाने परवानगीशिवाय Roblox वर ४२ हजार रुपये खर्च केले" अशा शीर्षकाची ही पोस्ट r/RobloxSupport या ग्रुपमध्ये शेअर करण्यात आली आहे.
पोस्टमध्ये मुलाच्या भावाने लिहिलं आहे की, त्याच्या लहान भावाने अभ्यासाच्या नावाखाली वडिलांचा फोन घेतला आणि Roblox गेममध्ये लॉग इन करून एकामागोमाग एक अनेक खरेदी केल्या. या प्रकारामुळे त्यांचं कुटुंब मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलं आहे. त्याने सांगितलं की, मुलाने एकूण ४२,६४७ रुपयांचे 'Robux' (Roblox गेममधील चलन) खरेदी केले आणि आता त्याच्या खात्यात फक्त १०० Robux शिल्लक आहेत. या अनपेक्षित खर्चामुळे वडिलांना कर्जाचा हप्ता भरणंही कठीण झालं आहे, इतकंच नाही तर कुटुंबाच्या शैक्षणिक खर्चावरही याचा परिणाम झाला आहे.
या पोस्टसोबत त्याने व्यवहारांच्या इतिहासाचा (transaction history) एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यात प्रत्येकी सुमारे २,००० रुपयांचे अनेक व्यवहार दिसत आहेत. या सर्व व्यवहारांची एकूण रक्कम ४२,६४७ रुपये झाली.
एवढे पैसे खर्च झाल्यानंतर, आता हे पैसे परत मिळवण्याचा काही मार्ग आहे का, अशी विचारणा करत त्याने Reddit वर मदतीची मागणी केली आहे.
या पोस्टवर Reddit युजर्सनी अनेक सल्ले दिले आहेत. बऱ्याच जणांनी ताबडतोब बँकेशी संपर्क साधून 'चार्ज-बॅक' (chargeback) करण्याची विनंती करण्याचा सल्ला दिला. मात्र, असं केल्यास Roblox अकाऊंट कायमचं ब्लॉक होऊ शकतं, असा इशाराही दिला.
काही युजर्सनी हे व्यवहार परवानगीशिवाय झाल्याचं सांगून Roblox सपोर्ट टीमशी संपर्क साधायला किंवा Google Play Store द्वारे रिफंडसाठी अर्ज करायला सांगितलं. अनेकांच्या मते, ही एक मोठी चूक असली तरी, दुसऱ्याच्या फोनवरून परवानगीशिवाय पैसे खर्च न करण्याचा हा एक महत्त्वाचा धडा आहे. जर पैसे परत मिळत असतील, तर अकाऊंट गमावणं ही एक योग्य शिक्षा ठरू शकते, असंही मत अनेकांनी व्यक्त केलं.