
मुंबई : गुजरातच्या एकता नगरमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक भारी बातमी आहे. पर्यटक आता इथे कोणत्याही ऋतूत कृत्रिम पाऊस, धबधबे आणि थरारक ग्लास स्कायवॉकसह रेनफॉरेस्टची (पावसाळी जंगल) मज्जा घेऊ शकतील.
हे नवीन रेनफॉरेस्ट अट्रॅक्शन १२ एकर परिसरात आणि १२ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलं आहे. हा प्रोजेक्ट पर्यटकांना वर्षभर पावसाळ्यासारखं वातावरण अनुभवण्याची संधी देतो. या प्रोजेक्टमध्ये २० रेन-गन टॉवर्स बसवले आहेत. हे टॉवर्स कृत्रिम पाऊस पाडतात. त्यामुळे उन्हाळ्यातही पर्यटकांना भर पावसात जंगलात फिरल्याचा फील येतो.
इथलं वातावरण आणखी भारी करण्यासाठी प्रशासनाने बबल फाउंटन, धबधबे आणि भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधून आणलेली झाडं लावली आहेत. हिरवळ आणि पाण्याचा हा भन्नाट मेळ पर्यटकांना थेट एखाद्या खऱ्याखुऱ्या रेनफॉरेस्टमध्ये आल्यासारखा वाटतो.
या प्रोजेक्टचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथला गोलाकार ग्लास स्कायवॉक. हा स्कायवॉक ३५-मिमी जाडीच्या कोरियन काचेच्या १३२ पॅनल्सपासून बनवला आहे. या पारदर्शक काचेच्या पुलावरून चालताना पर्यटक खालील जंगलाचा नजारा पाहू शकतात, जो त्यांना एक थरारक अनुभव देतो.
भारतातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे. हा नवीन प्रोजेक्ट 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या पर्यटनात आणखी एक मानाचा तुरा रोवतो. कृत्रिम पाऊस, हिरवीगार झाडी, धबधबे आणि काचेचा स्कायवॉक या सगळ्यामुळे पर्यटक आता वर्षभर पावसाळ्याची मज्जा लुटू शकतील.