माजी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी सोनिया गांधी स्वतःला ख्रिश्चन मानत नाहीत, असे म्हटले आहे.
नवी दिल्ली: इटलीमध्ये जन्मलेल्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी स्वतःला ख्रिश्चन मानत नाहीत, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे. 'पीटीआय व्हिडिओज' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'एकदा मी सोनिया गांधींना ख्रिसमसच्या निमित्ताने 'मॅडम, मेरी ख्रिसमस' असे म्हटले. पण त्यांनी ते स्वीकारले नाही आणि 'मी ख्रिश्चन नाही' असे म्हटले. मला धक्काच बसला. सोनिया गांधी स्वतःला ख्रिश्चन मानत नाहीत हे मला तेव्हा कळले.' 'मी नास्तिक आहे. पण इतर धर्मांचा आदर करतो,' असेही मणिशंकर अय्यर म्हणाले.
'मला राजकारणात आणणारेही गांधी, पाडणारेही गांधी'
नवी दिल्ली: 'मला राजकारणात आणणारेही गांधी कुटुंब आणि पाडणारेही गांधी कुटुंब,' असे ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले. 'पीटीआय व्हिडिओज'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'गेल्या 10 वर्षांत सोनिया गांधींनी मला भेटण्याची परवानगी दिली नाही. राहुल गांधींनीही 10 वर्षांत एकदा सोडल्यास मला भेटण्याची परवानगी दिली नाही. प्रियांका गांधींनाही मी फक्त एक-दोनदाच भेटलो आहे. एकदा राहुल गांधींना शुभेच्छा देण्यासाठी प्रियांका गांधींना फोन करावा लागला होता.'
प्रणव मुखर्जींना पंतप्रधान न बनवल्यानेच काँग्रेसचा पराभव: अय्यर
नवी दिल्ली: २०१२ मध्ये राष्ट्रपती निवडणूक झाली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती बनवायला हवे होते आणि मंत्री प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधानपदी बसवायला हवे होते. असे केले असते तर २०१४ मध्ये यूपीए-३ सरकार निश्चितच अस्तित्वात आले असते, असे ज्येष्ठ काँग्रेसी नेते मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे. अय्यर यांनी लिहिलेल्या 'अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स' या पुस्तकात ही माहिती आहे. 'एकदा सोनिया गांधींनी प्रणव मुखर्जींना बोलावून २०१२ मध्ये 'तुम्ही पंतप्रधान होऊ शकता' असे संकेत दिले होते. याबद्दल माझ्यासमोर प्रणव मुखर्जी म्हणाले होते, 'सोनिया गांधींच्या ऑफरने मला आश्चर्य वाटले.' पण झाले उलटेच. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाले. सिंग पंतप्रधान राहिले. यामुळे धोरणात स्थगिती आली. यूपीए-३ सरकार स्थापन होण्याची शक्यताच नष्ट झाली,' असे अय्यर म्हणाले. 'प्रणव मुखर्जी उत्साही कार्यकर्ते होते. त्यांना पंतप्रधानपद द्यायला हवे होते. प्रशासनात खूप अनुभवी असलेल्या डॉ. सिंग यांना राष्ट्रपतीपद द्यायला हवे होते,' असे अय्यर यांनी म्हटले आहे.