Sonam Wangchuk : २१ व्या दिवशी उपोषणकर्ते सोनम वांगचुक रुग्णालयात, जंतर मंतरवर प्रचंड गोंधळाची स्थिती

Published : Jul 18, 2026, 08:35 AM ISTUpdated : Jul 18, 2026, 09:11 AM IST
sonam wangchuk

सार

उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेले आहे. सध्या जंतर मंतरवर मोठा गदारोळ निर्माण झाल्याची स्थिती आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.

मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर येथे 28 जूनपासून लडाखचे सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. अखेर उपोषणाच्या 21 व्या दिवशी सोनम वांगचुक यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले. प्रकृती खालावत असल्याने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सफदरजंग रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल

सोनम वांगचुक यांना दिल्ली सरकारच्या सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले आहे. तेथील आयसीयुमध्ये वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, वांगचुक शुद्धीवर आहेत. यासोबत त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, दीर्घकाळ उपोषणामुळे वांगचुक यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले. या निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वांगचुक यांना आवश्यक वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान काही आंदोलकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी संयम बाळगत संपूर्ण कारवाई सुरक्षितपणे पूर्ण केल्याचा दावा केला आहे.

‘प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान’ : उच्च न्यायालय

या प्रकरणाची सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठाने वांगचुक यांच्या आरोग्यावर दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले होते. "प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे. डॉक्टरांच्या अहवालानुसार आवश्यक उपचार तातडीने केले जावेत," असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारांवरून आंदोलन

सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यासाठी 28 जूनपासून उपोषण सुरू केले होते. NEET परीक्षेतील कथित अनियमितता, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि कथित घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी या आंदोलनामागे होती. आज वांगचुक यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस आहे.

आंदोलनस्थळवरील व्हिडीओ व्हायरल

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये पोलीस वांगचुक यांना रुग्णालयात नेण्यासाठी स्टेजवर गेल्याचे दिसतेय. "दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले," असा आरोपही त्यांनी केला.

 

 

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Bihar Boat Tragedy: बिहारमध्ये गंगेत बोट उलटली, १३ निष्पाप मुलांचा मृत्यू
Gold Reserves : जगात सर्वाधिक सोनं असलेल्या टॉप १० देशांची यादी, भारत कितव्या नंबरवर?