
Tharoor convoy attack : केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील वांडूर येथे हा प्रकार घडला असून, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला अडवून गोंधळ घातला. या घटनेमुळे निवडणूक प्रचारातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शशी थरूर हे UDF उमेदवार एपी अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी वांडूर येथे गेले होते. ते दोन वाहनांतून प्रवास करत असताना अचानक 10 ते 15 जणांच्या जमावाने त्यांच्या कारला अडवले. जमावाने कारच्या काचांवर हात मारत वाहन पुढे जाऊ दिले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बाहेर पडलेल्या गनमॅनवर जमावाने हल्ला चढवून त्याला मारहाण केली.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वांडूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून आतापर्यंत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून स्थानिक नागरिकांचे जबाब नोंदवले जात आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
शशी थरूर यांनी या घटनेला सुनियोजित हल्ला असल्याचा आरोप केला आहे. विरोधकांकडून हा हल्ला घडवून आणल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र या प्रकरणावर थरूर यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसून त्यांच्या सहकाऱ्यांनी हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.
केरळमध्ये सध्या UDF आणि LDF यांच्यात कडवी लढत सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रचारादरम्यान घडलेली ही घटना राजकीय तणाव वाढवणारी ठरत आहे. या घटनेत थरूर यांना कोणतीही दुखापत झाली नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात आहे. पोलिस यंत्रणेवरही या घटनेनंतर दबाव वाढला आहे.