
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाबाबत केलेल्या वक्तव्यांवरून नाराजी असल्यास माफी मागण्याची तयारी दर्शवली. सुप्रीम कोर्ट ही न्यायाची शेवटची आशा असल्याचं सांगत त्यांनी न्याय मिळण्यासाठी दहा वेळा माफी मागायलाही तयार असल्याचं म्हटलं. SIR प्रक्रियेत १२ ते १३ कोटी मतदारांची नावं वगळल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली. शिवसेनेतील फूट आणि पक्षचिन्हाच्या वादात चार वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमदार-खासदारांची खरेदी, घटनात्मक संस्थांवरील दबाव आणि लोकशाहीच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत सरन्यायाधीशांनी कोणत्याही दबावाखाली न येता संविधानाचं रक्षण करावं, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुप्रीम कोर्टात न्याय मागण्यासाठी गेलेल्या लोकांचा उद्देशही त्यांनी स्पष्ट केला.