सांभाळ दंगलखोरांकडूनच मालमत्तेच्या नुकसानीची वसुली!

उत्तर प्रदेशातील सांभाळ येथे झालेल्या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांकडूनच नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.

 

सांभाळ  : उत्तर प्रदेशातील सांभाळ येथे हिंसाचार घडवणाऱ्या आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई उत्तर प्रदेश सरकार वसूल करणार आहे आणि सार्वजनिक ठिकाणी दगडफेक करणाऱ्यांचे पोस्टर प्रदर्शित करणार आहे. मशीद सर्वेक्षणाच्या विरोधात हजारो लोकांनी सर्वेक्षण करणाऱ्यांवर आणि पोलिसांवर दगडफेक केली होती. ६ वाहनांसह पोलिसांच्या वाहनाला आग लावण्यात आली होती. त्यांचा गोंधळ रेकॉर्ड होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्यात आले होते. मशीदीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात मालमत्तेची तोडफोड करण्यात आली होती.

याबाबत बुधवारी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘दंगलखोरांविरुद्ध योगी सरकार कठोर भूमिका घेत आहे. दगडफेक करणारे आणि गुंडांचे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केले जातील आणि त्यांच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल. अटक केलेल्यांकडून नुकसानीची रक्कम वसूल केली जाईल’.

याच प्रकारच्या उपक्रमात, सरकारने २०२० मध्ये सीएए विरोधी आंदोलनादरम्यान तोडफोड करणाऱ्यांचे पोस्टर लावले होते. परंतु नंतर न्यायालयाच्या आदेशानंतर ते काढून टाकण्यात आले. आतापर्यंत पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे. २,७५० हून अधिक अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या अधिकृत प्रवक्त्याने याबाबत बोलताना सांगितले की, “सांभाळ हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध उत्तर प्रदेश सरकार कठोर भूमिका घेत आहे. दगडफेक करणारे आणि गुंडांचे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केले जातील आणि नुकसानीची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले जाऊ शकते.”

सर्वेक्षण पथक आपले काम पुन्हा सुरू करताच मोठी गर्दी मशिदीजवळ जमली आणि घोषणा देऊ लागली तेव्हा सांभाळ रविवारी तीव्र हिंसाचाराला साक्षीदार बनले. रविवारच्या हिंसाचारानंतर विरोधी पक्षांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश दोन्ही ठिकाणी सत्तेवर असलेल्या भाजपवर टीका केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी राज्य सरकार “दंगल” घडवत असल्याचा आरोप केला आहे, तर ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनी सत्ताधारी पक्ष हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडत असल्याचे म्हटले आहे.

Share this article