
भारतीय फॅशन डिझायनर रोहित बाल यांचे निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील खाजगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. ऑक्टोबरमधील एका शो नंतर त्यांची प्रकृती खराब झाली आणि नंतर रोहित यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शोच्या आधी रोहित आयसीयूमध्ये होते.
दिग्गज डिझायनर रोहित बाल यांच्या निधनामुळे आम्हाला दुःख झाले आहे. ते फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया (FDCI) चे स्थापक सदस्य होते. पारंपारिक नमुन्यांपासून ते आधुनिक डिझाईन्सपर्यंत त्यांचे काम खूप वैविध्यपूर्ण होते. त्यांच्या कलात्मक वारसा, नावीन्य आणि दूरदृष्टी फॅशन जगात कायम राहील, असे फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील सेठी म्हणाले.
कमी वेळातच रोहित यांनी फॅशन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. २०१० च्या फेब्रुवारीमध्ये रोहित यांच्या अँजिओप्लास्टी झाली होती, असे वृत्त आहे. २००६ च्या इंडियन फॅशन अवॉर्ड्स आणि २००१ च्या किंगफिशर फॅशन अचिव्हमेंट अवॉर्ड्समध्ये त्यांनी स्थान पटकावले होते. श्रीनगरमध्ये जन्मलेले रोहित बाल यांनी १९८६ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ते देशातील सर्वात प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सपैकी एक होते.
रोहित बाल यांच्या डिझाईन्स भारतीय संस्कृती आणि इतिहासशी जोडलेल्या होत्या. २००६ मध्ये इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये त्यांना 'डिझायनर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला होता. २०१२ मध्ये त्यांना लॅक्मे ग्रँड फिनाले डिझायनर म्हणूनही निवडण्यात आले होते.