
RBI Action Paytm Bank : आरबीआयने नियमांचे पालन न केल्याच्या कारणावरून पेटीएम पेमेंट बँकिंग (PPBL) चा बँकिंग परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बँकेचे कामकाज ठेवीदारांच्या हिताविरोधात असल्याचे निरीक्षण नोंदवत RBI आता या बँकेचे पूर्णपणे बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे संकेत आहेत. या निर्णयामुळे लाखो वापरकर्त्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
आरबीआयनेने स्पष्ट केले की, बँकेने परवान्याच्या अटींचे वारंवार उल्लंघन केले. बँकेचे व्यवस्थापन आणि कामकाज ठेवीदारांच्या आणि सार्वजनिक हिताच्या विरोधात असल्याचे गंभीर निरीक्षण नोंदवण्यात आले. RBIच्या मते, अशा परिस्थितीत बँकेला पुढे काम करण्याची परवानगी देणे योग्य नाही.
परवाना रद्द झाल्यानंतर पेटीएम पेमेंट बँक यापुढे बँक म्हणून काम करू शकणार नाही. नवीन ठेवी स्वीकारणे, खाते उघडणे किंवा इतर बँकिंग व्यवहार करण्यावर पूर्ण बंदी आली आहे. आरबीआय आता न्यायालयीन प्रक्रियेद्वारे बँकेला पूर्णपणे बंद करण्याची तयारी करत आहे.
या निर्णयानंतर ग्राहकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असली तरी RBIने स्पष्ट केले आहे की बँकेकडे सर्व ठेवीदारांना पैसे परत करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरण्याची गरज नाही. बँकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.
Paytm Wallet, UPI आणि FASTagसारख्या सेवांवर आधीच निर्बंध होते. आता परवाना रद्द झाल्यामुळे या सेवांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. वापरकर्त्यांना लवकरच पर्यायी बँकिंग आणि पेमेंट पर्याय स्वीकारावे लागू शकतात.
RBIने 2022 मध्ये नवीन ग्राहक नोंदणीवर बंदी घातली होती. त्यानंतर 2024 मध्ये आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले. मात्र, या सर्व इशाऱ्यांनंतरही बँकेच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झाली नाही, त्यामुळे अखेर हा कठोर निर्णय घेण्यात आला.
RBI आणि कंपनीकडून अधिकृत मार्गदर्शक सूचना येईपर्यंत ग्राहकांनी घाबरून निर्णय घेऊ नये. पैसे काढणे, खाते बंद करणे आणि इतर सेवांबाबत लवकरच स्पष्ट सूचना दिल्या जाणार आहेत. दरम्यान, पर्यायी बँकिंग पर्याय तयार ठेवणे योग्य ठरेल.