
Ashok Mittal Joins BJP: आम आदमी पार्टीमध्ये (AAP) शुक्रवारी मोठा राजकीय भूकंप झाला. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात (BJP) जाण्याची घोषणा केल्यानंतर, आता अशोक मित्तल यांचं नाव समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अशोक मित्तल हे तेच नेते आहेत, ज्यांना अरविंद केजरीवाल यांनी २ एप्रिल २०२६ रोजी राघव चड्ढा यांना हटवून राज्यसभेत 'आप'चं उपनेतेपद दिलं होतं. पण आता अवघ्या काही दिवसांतच त्यांनीही पक्ष सोडला असून, ते राघव चड्ढा यांच्यासोबत भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. या घडामोडीमुळे 'आप'च्या अंतर्गत राजकारणावर आणि नेतृत्वावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
२ एप्रिल २०२६ रोजी आम आदमी पार्टीने राज्यसभेच्या सचिवालयाला पत्र पाठवून राघव चड्ढा यांना उपनेते पदावरून हटवून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केल्याची अधिकृत माहिती दिली होती. त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत राज्यसभेच्या वेबसाइटवर हा बदल दिसू लागला होता. राघव चड्ढा यांचं महत्त्व कमी करण्याचा आणि पक्षातील समीकरणं बदलण्याचा हा प्रयत्न मानला जात होता. पण फक्त १५ दिवसांनंतरच अशोक मित्तल यांनीही पक्ष सोडल्याने 'आप'साठी हा आणखी मोठा धक्का ठरला आहे.
अशोक मित्तल हे पंजाबमधून राज्यसभेचे खासदार आहेत आणि देशातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था 'लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी' (LPU) चे संस्थापक आणि कुलपती आहेत. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात त्यांची एक मोठी ओळख आहे. 'आप'ने त्यांना राज्यसभेत पाठवून पंजाबमधील आपली राजकीय पकड मजबूत करण्याची रणनीती आखली होती. आता त्यांनी पक्ष सोडल्यामुळे त्याचा थेट परिणाम पंजाबच्या राजकारणावर होऊ शकतो.
१५ एप्रिल २०२६ रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अशोक मित्तल यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. ही कारवाई फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (FEMA) च्या कथित उल्लंघनाशी संबंधित तपासाअंतर्गत करण्यात आली होती.
ED ने जालंधरमधील त्यांचं निवासस्थान, LPU कॅम्पस आणि इतर ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई जवळपास तीन दिवस चालली आणि १७ एप्रिलला संपली. तेव्हापासूनच पक्षात काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. आता २४ एप्रिल रोजी त्यांनी 'आप' सोडल्याच्या बातमीने या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 'आप'च्या एकूण ७ राज्यसभा खासदारांनी पक्ष सोडला आहे किंवा ते भाजपमध्ये सामील होण्याच्या प्रक्रियेत आहेत. या नावांमध्ये राघव चड्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता, संदीप पाठक आणि विक्रमजीत साहनी यांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. जर हे विलीनीकरण अधिकृत झालं, तर राज्यसभेतील 'आप'च्या संख्याबळावर मोठा परिणाम होईल.
या संपूर्ण घडामोडीवर 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. "भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या लोकांचा विश्वासघात केला आहे," असं ते म्हणाले. पंजाबशी संबंधित नेत्यांना आपल्या बाजूला करून भाजप राज्यातील राजकारणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांचा स्पष्ट रोख होता.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही या मुद्द्यावर कडक भूमिका घेतली. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना त्यांनी "गद्दार" म्हटलं आहे. भगवंत मान म्हणाले की, "भाजपला नेहमीच पंजाब आणि पंजाबी लोकांपासून अडचण राहिली आहे. आधी RDF रोखला, मग आमदारांना लक्ष्य केलं आणि आता खासदारांना आपल्या बाजूला घेऊन पंजाबच्या पाठीत खंजीर खुपसला आहे." भाजपचा पंजाबमध्ये स्वतःचा जनाधार नाही, त्यामुळे ते 'आप'चा जनाधार तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.