
नवी दिल्ली - उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव काल (सोमवार) अचानक राजीनामा दिल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शंका-कुशंका आणि राजकीय तर्कवितर्कही लढवले जात आहेत.
धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, "वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि आरोग्याची प्राथमिकता लक्षात घेऊन" राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. मार्च महिन्यात AIIMS रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. तसेच जून महिन्यात एका कार्यक्रमात ते चक्कर येऊन बेशुद्ध पडले होते. मात्र, संसद सत्राच्या पहिल्याच दिवशी त्यांची सक्रिय उपस्थिती पाहता, केवळ आरोग्य हेच कारण असल्यावर अनेकांना शंका वाटू लागली आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले, “धनखड यांचा राजीनामा ‘अस्पष्ट आणि धक्कादायक’ आहे. पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करावा, कारण येथे काहीतरी लपवले जात आहे.” विरोधकांचा दावा आहे की, ही एक राजकीय घडामोड असून यामागे केवळ वैयक्तिक आरोग्य नव्हे, तर अंतर्गत संघर्ष किंवा दबाव असू शकतो.
धनखड यांनी राजीनामा संसद सत्राच्या पहिल्याच दिवशी दिला. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांनी बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीच्या बैठकीचे आयोजनही केले होते. त्यामुळे “त्यांना हटवण्यात आले का?” किंवा “ते कोणत्या दबावाखाली होते का?” यावर तर्कवितर्क सुरू आहेत.
या अचानक झालेल्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले असून निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह आणि महाराष्ट्रातून हरिभाऊ बागडे यांचे नाव एनडीएकडून आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. बागडे सध्या राजस्थानचे राज्यपाल असून विशेष म्हणजे धनखड हेही राजस्थान येथील आहेत.
राजीनामा देण्यापूर्वीचा राजस्थानमधील जगदीप धनकड यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात, की मी कधीही दबाब देत नाही. आणि दबावात तर मुळीच काम करत नाही.
धनखड हे मुळचे राजस्थानचे असून एकेकाळी काँग्रेसमध्येही त्यांनी भूमिका बजावली होती. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०१९ साली प. बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती मिळाली. २०२२ मध्ये त्यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती.