
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशातील सर्वोच्च संवैधानिक पदांपैकी एक असलेल्या भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला आहे. आरोग्य कारणास्तव आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून त्यांच्या राजीनाम्याची माहिती दिली असून, संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार हा राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
धनखड यांनी त्यांच्या पत्रात नमूद केलं की, “माझ्या प्रकृतीला प्राधान्य देत, डॉक्टरांचा सल्ला मान्य करून मी भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देत आहे.”
राजीनाम्यामध्ये त्यांनी राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे सहकार्य, विश्वास आणि स्नेहाबद्दल मन:पूर्वक आभार मानले आहेत. विशेषतः संसदेतील माननीय सदस्यांकडून मिळालेल्या प्रेम, सन्मान आणि विश्वासाची आठवण त्यांनी कायमस्वरूपी आपल्या मनात जपली जाईल, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
धनखड यांनी पुढे म्हटलं की, “देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि परिवर्तनशील वाटचालीचा साक्षीदार होणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. भारताची उज्वल, सामर्थ्यशाली आणि वैश्विक ओळख निर्माण होत असतानाचा हा काळ, मी उपराष्ट्रपती म्हणून अनुभवू शकलो, याचा मला खूप अभिमान आहे.”
जन्म: राजस्थान, झुंझुनू जिल्हा (1951)
राजकीय सुरुवात: 1989 साली खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश
महत्त्वाची पदं:
1990: संसदीय कामकाज राज्यमंत्री
1993-1998: राजस्थान विधानसभा सदस्य
2019-2022: पश्चिम बंगालचे राज्यपाल
2022: भारताचे 14वे उपराष्ट्रपती
धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता 60 दिवसांच्या आत नव्या उपराष्ट्रपतीसाठी निवडणूक होणार आहे. तोपर्यंत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतील.
जगदीप धनखड यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच देशाच्या राजकारणात एक मोठा वळण घेणारा क्षण आहे. त्यांच्या संयमी नेतृत्वशैलीची आणि संसदेतील भूमिका सर्व स्तरांतून गौरवली गेली आहे. आता देशाला नव्या उपराष्ट्रपतीच्या निवडीकडे लक्ष लागले आहे.