
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ ऑक्टोबरला संध्याकाळी साडेपाच वाजता नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये 'इमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह २०२६' चं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
अधिकृत माहितीनुसार, २७ ते २९ ऑक्टोबर असे तीन दिवस चालणाऱ्या या कॉन्क्लेव्हमध्ये जगभरातले आघाडीचे शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि स्टार्टअप्स एकत्र येतील. यात भारताचं विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनवीन शोधांच्या प्राधान्यक्रमांवर सविस्तर चर्चा होईल.
या कार्यक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), बायोटेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थकेअर, ऊर्जा, हवामान आणि महासागर विज्ञान अशा १२ महत्त्वाच्या विषयांवर मंथन होईल. देशाची क्षमता आणि वैज्ञानिक प्रगतीचा प्रत्यक्ष व्यवहारात कसा वापर करता येईल, यावर मुख्य भर असेल. याशिवाय, इथं एक मोठं तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन प्रदर्शनही भरवलं जाणार आहे. यात भारताने विज्ञानात मिळवलेलं यश आणि नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, यात सुमारे १५० डीप-टेक स्टार्टअप्सचे स्टॉल्स असतील, जे वेगवेगळ्या क्षेत्रांमधील तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचे उपयोग दाखवतील.
विज्ञानातील प्रगती लोकांना सोप्या भाषेत समजावी यासाठी या कॉन्क्लेव्हमध्ये माहितीपट, टेक्नॉलॉजी डेमो, इन्फॉर्मेशन किओस्क आणि ऑगमेंटेड तसंच व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) चा वापर केला जाणार आहे.
'ग्लोबल कनेक्ट नेटवर्किंग इव्हेंट' या नव्या उपक्रमांतर्गत भारत आणि परदेशातील शिक्षण, संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील ३०० हून अधिक निमंत्रित सहभागी होणार आहेत. लॅबमधील शोध थेट मार्केटपर्यंत कसे पोहोचवता येतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भागीदारी कशी वाढवता येईल, यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे.
याआधी, रविवारी पंतप्रधान मोदींनी ओडिशातील भुवनेश्वर इथं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन डेटा सेंटर आणि सायबर सिक्युरिटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं उद्घाटन केलं. देशाची संस्थात्मक आणि तांत्रिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. तसंच, डिजिटल बँकिंग आणि आर्थिक समावेशकतेतील बदलांवरही त्यांनी प्रकाश टाकला.भुवनेश्वरमधील या आरबीआयच्या नव्या सुविधेमुळे ओडिशा राज्यासोबतच संपूर्ण देशाला मोठा फायदा होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.