
मुंबई : आज देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना फुले वाहून आदरांजली वाहिली. याआधी आज सकाळी पंतप्रधान मोदींनी 'X' वर एक पोस्ट करून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला अभिवादन केलं. आपल्या पोस्टमध्ये मोदी म्हणाले की, 'स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्नं 'विकसित भारत' घडवण्यासाठी आपल्याला आजही प्रेरणा देत आहेत.' भारताचा विकासाचा प्रवास यापुढेही अधिक वेगाने सुरू राहो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांच्या शौर्य, त्याग आणि अटूट वचनबद्धतेमुळे वसाहतवादी राजवट संपली, त्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे आपण कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. विकसित भारत घडवण्यासाठी त्यांचे स्वप्न आपल्याला प्रेरणा देत आहे. १४० कोटी भारतीयांच्या शक्तीमुळे आपला देश विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवी शिखरं गाठत आहे. हा प्रवास भविष्यात आणखी वेगाने पुढे जावो."
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं. पंतप्रधान मोदी शनिवारी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्याचं नेतृत्व करतील. यावर्षीच्या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे, आपलं राष्ट्रगीत 'वंदे मातरम्'ला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच, 'विकसित भारत २०४७' च्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत 'युवा शक्ती'च्या भूमिकेवर विशेष भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात पहिल्यांदाच 'वंदे मातरम्'चं गायन होणार आहे.
या सोहळ्यात लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे एकूण २,५०० मुलं-मुली कॅडेट्स आणि 'माय भारत'चे स्वयंसेवक सहभागी होतील. ते ज्ञानपथावर बसून 'वंदे मातरम्' हे शब्द तयार करतील. ज्ञानपथावर 'विकसित भारत@२०४७' ही थीम दर्शवणारे व्ह्यू कटर्सही लावले जातील.
या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रांतील सुमारे ५,००० विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये महिला उद्योजक, सफाई कर्मचारी, रस्त्यावरील विक्रेते, तरुण संशोधक, शास्त्रज्ञ, स्टार्टअप संस्थापक, कारागीर, शेतकरी, विद्यार्थी आणि सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे.याशिवाय, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून आलेले १,५०० हून अधिक लोक त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.