PBKS vs MI Qualifier 2 सामना रद्द झाला तर फायनलमध्ये आरसीबीविरुद्ध कोण भिडणार? वाचा IPL प्लेऑफ्सचा नियम

Published : May 31, 2025, 01:14 PM IST
PBKS vs MI Qualifier 2

सार

PBKS vs MI Qualifier 2 : 1 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणारा क्वालिफायर-2 सामना होणार आहे. या सामान्यात कोण जिंकणार याकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. 

PBKS vs MI Qualifier 2 : आयपीएल 2025 आता अंतिम टप्प्यावर आला असून 1 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणारा क्वालिफायर-2 सामना सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे आणि याच सामन्याचा विजेता अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध खेळेल. आरसीबीने क्वालिफायर-1 मध्ये पंजाबचा पराभव करत फायनलमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. 

मात्र, जर पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हा क्वालिफायर-2 सामना पूर्णपणे रद्द झाला, तर पुढे काय होईल, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. अशा परिस्थितीत आयपीएलचे प्लेऑफ नियम काय सांगतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आयपीएलच्या प्लेऑफ फॉरमॅटनुसार, लीग स्टेजनंतर अव्वल चार संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतात. यामध्ये टॉप दोन संघ क्वालिफायर-1 मध्ये एकमेकांशी भिडतात. या सामन्याचा विजेता थेट फायनलमध्ये पोहोचतो. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघात एलिमिनेटर सामना होतो आणि त्याचा विजेता क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेल्या संघाशी क्वालिफायर-2 मध्ये खेळतो.

 

 

या वर्षी पंजाब किंग्जने 21 गुणांसह पहिल्या क्रमांकावर राहत लीग टप्पा पूर्ण केला, तर RCB देखील 21 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये आपले स्थान निश्चित केले. अशा परिस्थितीत, जर क्वालिफायर-2 सामना पूर्णपणे रद्द झाला, तर अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी आयपीएलचा स्पष्ट नियम आहे – ज्या संघाने लीग टप्प्यात अधिक गुण मिळवले आहेत, त्या संघाला फायनलमध्ये थेट प्रवेश दिला जातो. त्यामुळे, पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सपेक्षा जास्त गुण मिळवले असल्याने, सामना रद्द झाल्यास पंजाब किंग्ज अंतिम सामन्यात आरसीबीच्या विरुद्ध मैदानात उतरेल. 

 

 

मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता कमी असून, सामना नियोजित वेळेनुसार खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे. तरीही हवामानात अचानक बदल झाल्यास आणि सामना रद्द झाला, तर पंजाब फायनलमध्ये पोहोचेल, असा नियम IPLमध्ये स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे चाहत्यांच्या उत्सुकतेत अजून वाढ झाली आहे की अंतिम फेरीत RCBचा सामना कोणत्या संघाशी होणार हे आता हवामानावरही अवलंबून असेल.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

वंदे मातरम् एडिट केल्यानेच देशाची फाळणी? अमित शहांच्या विधानाने संसदेत वाद
महिला कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी; मासिक पाळीच्या रजेला हायकोर्टाची स्थगिती