
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 'फाळणी विभिषिका स्मृती दिना'निमित्त भारताच्या फाळणीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. हा दिवस त्या लोकांच्या धैर्याची आणि संघर्षाची आठवण करण्याचा आहे, ज्यांचं आयुष्य फाळणीमुळे उद्ध्वस्त झालं, कुटुंबं विखुरली आणि ज्यांना प्रचंड दुःख सोसावं लागलं, असं पंतप्रधान म्हणाले.
मोदींनी 'X' वर (पूर्वीचं ट्विटर) लिहिलं, "आज आपण #PartitionHorrorsRemembranceDay साजरा करत आहोत. फाळणीचा फटका बसलेल्या सर्वांच्या धैर्याचं आपण स्मरण करतो. इतिहासातील त्या क्षणाने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं... कुटुंबं मुळापासून उखडली गेली, प्रियजन गमावले आणि असह्य दुःख सोसावं लागलं. पण यावर मात करत लोकांनी शून्यातून आपलं आयुष्य पुन्हा उभं केलं आणि आपल्या देशाच्या प्रगतीत मोठं योगदान दिलं."
आज आपण #PartitionHorrorsRemembranceDay साजरा करत आहोत. आम्ही त्या सर्वांच्या धैर्याचे स्मरण करतो ज्यांना फाळणीचा फटका बसला होता. इतिहासातील तो एक क्षण होता ज्याने अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले... कुटुंबे उद्ध्वस्त झाली, प्रियजन गमावले आणि प्रचंड दुःख सहन करावे लागले. त्याच वेळी,… — नरेंद्र मोदी (@narendramodi) ऑगस्ट 14, 2026
त्यांनी पुढे लिहिलं की, "त्यांचा जीवनप्रवास आपल्याला मानवी जिद्दीच्या ताकदीची आठवण करून देतो. हा दिवस आपल्या देशात सलोखा आणि बंधुभाव टिकवण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करो आणि 'विकसित भारत' घडवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची प्रेरणा देवो."
१९४७ मध्ये देशाच्या फाळणीदरम्यान ज्यांनी आपले प्राण गमावले आणि ज्यांना विस्थापित व्हावं लागलं, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतात दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी 'फाळणी विभिषिका स्मृती दिन' पाळला जातो.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य दिन हा कोणत्याही देशासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असतो; पण स्वातंत्र्याच्या या गोडव्यासोबत फाळणीचा मोठा आघातही भारतीयांना सोसावा लागला. या फाळणीने लाखो भारतीयांच्या मनावर कधीही न भरून येणाऱ्या जखमा दिल्या.
फाळणीमुळे मानवी इतिहासातील सर्वात मोठं स्थलांतर झालं. याचा फटका सुमारे २ कोटी लोकांना बसला. लाखो कुटुंबांना आपली वडिलोपार्जित गावं, शहरं सोडून निर्वासित म्हणून नवं आयुष्य सुरू करावं लागलं.