
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील शांत आणि लोकप्रिय हिल स्टेशन पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे दहशत पसरली. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडल्या. बायसरन मेडोवर दुपारी सुमारे २:३० वाजता काही दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंध गोळीबार केला ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि १२ इतर जखमी झाले. दरम्यान, या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची नावे अतुल मोने आणि दिलीप डिसले असल्याचे समजते.
या दहशतवादी हल्ल्यात पनवेल येथील माणिक पटेल जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर एस. भालचंद्र हेही जखमी झाले आहेत. दोघेही महाराष्ट्रातील आहेत. भालचंद्र यांच्याबद्दलची अधिक माहिती मिळालेली नाही. त्यांच्यावर तेथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुण्यातील पर्यटकांनी या हल्ल्याची माहिती देताना सांगितले, की दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते. त्यांनी मास्क घातले होते. त्यामुळे त्यांचे चेहरे दिसत नव्हते. त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. त्यांनी पर्यटकांची नावे विचारली. त्यानंतर त्यांना ठार मारले. तुम्ही मोदीला डोक्यावर चढवून ठेवले आहे. तुमच्यामुळे मोदी मोठे झाले. तुम्ही आम्हाला बदनाम केले. आमचा धर्म खराब केला, असे ते दहशतवादी म्हणत होते.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दहशतवादी सैन्याच्या गणवेशात होते आणि त्यांनी अगदी जवळून गोळीबार सुरू केला. घटनास्थळी रक्ताने माखलेली जमीन, इकडे-तिकडे विखुरलेले मृतदेह आणि रडणाऱ्या महिला, हे दृश्य भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हते. स्थानिक लोक तातडीने मदतीसाठी धावून आले आणि जखमींना सुरक्षित स्थळी नेले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की दहशतवाद्यांनी एका महिलेला तिचा धर्म विचारला आणि नंतर अंधाधुंध गोळीबार सुरू केला.
या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी द रेसिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली आहे, जो लष्कर-ए-तैयबाचा स्थानिक सहयोगी गट मानला जातो. टीआरएफने पर्यटनाला लक्ष्य करणे सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान बनले आहे.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी एक्स वर लिहिले की जखमींना त्वरित उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. एका जखमीला जीएमसी अनंतनाग येथे हलवण्यात आले आहे. सर्वांच्या लवकर बरे होण्याची कामना करतो.
माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध केला. त्यांनी एक्स वर लिहिले की पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला कायराना हल्ला दुर्दैवी आणि अस्वीकार्य आहे. काश्मीरने नेहमीच पर्यटकांचे उबदार स्वागत केले आहे आणि अशा प्रकारची हिंसा त्यावर डाग आहे.
बायसरन, पहलगामपासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर स्थित एक दुर्गम आणि सुंदर मेडो आहे, जिथे पायी किंवा पोनीनेच जाता येते. हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा काश्मीरचा पर्यटन हंगाम जोरात आहे आणि हजारो पर्यटक दरीकडे येत आहेत. अशात सुरक्षा दलांची उपस्थिती आणि गुप्तचर माहिती असूनही दहशतवादी तिथे कसे पोहोचले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.