
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उच्च शिक्षण विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची बदली करण्यात आली आहे. या जागी उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव म्हणून वरिष्ठ IAS अधिकारी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नरेश पाल गंगवार हे 1994 बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी 1993 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. राजस्थान सरकार आणि केंद्र सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. नरेश गंगवार यांचा 21 ऑक्टोबर 1970 रोजी उत्तराखंडमधील नैनीताल येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये बी.टेक, कम्युनिकेशन अँड रडारमध्ये एम.टेक आणि अर्थशास्त्रात एम.ए.पदवी मिळवली आहे.
राजस्थानमधील प्रशासनात गंगवार यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते टोंक, सवाई माधोपूर, झालावाड, जोधपूर आणि भरतपूर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी राहिले आहेत. त्यासोबत प्रशासकीय अनुभवासोबतच गंगवार यांनी राज्यातील विविध विभागांमध्ये धोरणात्मक पातळीवरही काम केले आहे.
वर्ष 2014 मध्ये राजस्थान सरकारने गंगवार यांची शालेय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली होती. या पदावर त्यांनी दीर्घकाळ काम करत शिक्षण क्षेत्रातील विविध धोरणांची अंमलबजावणी केली. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील गंगवार यांचा अनुभव लक्षणीय मानला जातो.
सुमारे अडीच दशक राजस्थान प्रशासनात काम केल्यानंतर वर्ष 2020 मध्ये त्यांची केंद्र सरकारमध्ये नियुक्ती झाली. गंगवार यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात संयुक्त सचिव पद भूषवले आहे. त्यानंतर अतिरिक्त सचिव म्हणून काम केले. ऑगस्ट 2025 मध्ये गंगवार यांची पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. आता त्यांच्यावर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थी आंदोलन सुरू आहे. अशातच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यामुळेच हा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे.