
मुंबई : तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर लोकसभेतील गैरवर्तन आणि महिला खासदारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच आरोप लावण्यात आला आहे. यामुळेच कल्याण बॅनर्जी यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता.
कल्याण बॅनर्जी यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तिदार आणि शताब्दी रॉय यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणानंतर सभागृहात तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. यासोबत कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली.
घटनेनंतर काकोली घोष दस्तिदार, शताब्दी रॉय आणि इतर काही खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. महिला खासदारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. अध्यक्षांनी या प्रकरणी लेखी तक्रार सादर करण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सभागृहाने हा प्रस्ताव मंजूर करत त्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
निलंबनाच्या निर्णयानंतर लोकसभा प्रशासनाने कल्याण बॅनर्जी यांना तात्काळ संसद परिसर सोडण्याचे निर्देश दिले. त्यामुळे उर्वरित पावसाळी अधिवेशनात त्यांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाहीये.