मेघालयातील चर्चमध्ये एका व्यक्तीने 'जय श्रीराम' घोषणा दिल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ही कृती मुद्दामहून केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शिलाँग: मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात एका व्यक्तीने चर्चमध्ये घुसून 'जय श्रीराम' घोषणा दिल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २०२३ मध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कडबा येथे दोन व्यक्तींनी मशिदीत घुसून जय श्रीराम घोषणा दिल्याची घटना घडली होती. ही घटना सर्वोच्च न्यायालयात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.
काय घडले?:
आकाश सागर नावाच्या व्यक्तीने मावलिनॉंग गावातील चर्चमध्ये घुसून जय श्रीराम घोषणा दिली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी घटनेचा निषेध करत म्हटले आहे की, 'ही मुद्दामहून केलेली कृती आहे. याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. सरकार सामाजिक, धार्मिक किंवा सांप्रदायिक सलोखा बिघडवण्यास परवानगी देणार नाही.' हिंदू संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही आकाशच्या कृत्याचा निषेध केला आहे.