एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर त्याचा परिणाम शेअर बाजारावर पडतो. आज संध्याकाळी हे आकडे समोर येतील. त्यामुळे शेअर बाजारात नेमक्या काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. मतदान संपल्यानंतर वेगवेगळी माध्यमं तसेच इतर संस्था आपापल्या एक्झिट पोलचे आकडे जाहीर करतील. याच आकड्यांच्या मदतीने देशात कोणाची सत्ता येणार? याचे अंदाज बांधले जातील. प्रत्यक्ष निकाल येत्या 4 जूनला जाहीर केला जाणार आहे. मात्र त्याआधीच 1 जूनला निवडणूक संपल्यानंतर हे एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले जातील. याच एक्झिट पोलचा शेअर बाजारावर काय परिणाम पडणार? असे विचारले जात आहे. त्यामुळे याआधी एक्झिट पोलच्या नंतर शेअर बाजारावर नेमका काय परिणाम पडलेला आहे? हे जाणून घेऊ या.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला की त्याचा परिणाम शेअर बाजारावर पडतो. अनपेक्षित निकाल आल्यास शेअर बाजार गडगडतो तर अपेक्षित निकाल आल्यावर शेअर बाजाराचा आलेख वर जातो. एक्झिट पोलच्या निकालानंतरदेखील शेअर बाजारावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम पडतो. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीपासून ते 2019 सालच्या निवडणुकीपर्यंत तशी उदहरणं पाहायला मिळतात.
2004 साली काय घडलं?
2004 साली लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा 10 मेला संपला होता. त्यानंतर साधारण एक्झिट पोल समोर आले होते. त्यानंतर 11 मेला शेअर बाजार चालू झाल्यानंतर शेअर बाजार चांगलाच गडगडला होता. 10 मेला मुंबई शेअर बाजारा 5,555.84 अंकांवर बंद झाला होता. 11 मे रोजी हाच सेन्सेक्स 5,325.90 अंकांवर आला होता. म्हणजेच एक्झिट पोलच्या निकालानंतर सेन्सेक्समध्ये 229.94 अंकांनी घसरण झाली होती. एक्झिट पोलच्या निकालानंतर गुंतवणूकदारांचे 4.14 टक्के नुकसान झाले होते.
2009 साली काय घडले?
2009 साली 13 मेला लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा होता. त्यानंतर एक्झिट पोलचा निकाल जाहीर करण्यात आला होता. 13 मे 2009 रोजी सेन्सेक्स 12,019.65 अंकांवर बंद झाला होता. एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स 11,872.91 अंकांपर्यंत खाली आला होता. म्हणजेच एक्झिट पोलच्या निकालामुळे सेन्सेक्स 1.22 टक्क्यांनी आणि 146.74 अंकांनी बंद झाला होता. निफ्टीचीही तशीच स्थिती होती. निफ्टी 3,635.25 अंकांवरून 3,593.45 अंकांपर्यंत खाली आला होता. म्हणजेच एक्झिट पोलच्या निकालामुळे निफ्टी 1.15 टक्क्यांनी आणि 41.8 अंकांनी घसरला होता.
2014 साली काय घडलं होतं?
2014 सालच्या निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये सत्तांतर होईल असे सांगण्यात आले होते. 2014 साली नरेंद्र मोदी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. या निवडणुकीसाठी 12 मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. या निवडणुकीत सर्व संस्थांनी भाजपला 272 ते 340 जागा मिळतील, असा अंदाज आपापल्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला होता. देशात सत्तांतर होणार हे जवळपास सगळ्यांनीच गृहित धरले होते. त्यामुळे यावेळी एक्झिट पोलच्या आकड्यांमुळे शेअर बाजारावर फारसा परिणाम झाला नाही. 12 मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपले तेव्हा सेन्सेक्स 23,551 अंकांवर बंद झाला. तर 13 मे रोजी सेक्सेक्समध्ये 1.36 ट्क्क्यांनी तेजी पाहायला मिळाली. निफ्टीदेखील 7,014.25 अंकांवरून 7,108.75 अंकांवर पोहोचला. निफ्टीमध्ये 1.35 टक्क्यांनी वाढ झाली.
2019 सालच्या निवडणुकीत काय घडलं होतं?
2019 सालची लोकसभा निवडणूक चांगलीच रंजक झाली होती. या निवडणुकीचा शेवटचा टप्पा 17 मे 2019 रोजी होता. त्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले होते. या एक्झिट पोलमध्ये भाजपला 300 तर एनडीएला 350 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याचा परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळाला. या एक्झिट पोलनंतर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. 17 मे रोजी सेन्सेक्स 37,930.77 वर होता. 20 मे रोजी सेन्सेक्समध्ये 1,421.9 अंकांसह 3.75 टक्क्यांनी वाढ झाली. 20 मे रोजी सेन्सेक्स 39,352.67 वर पोहोचला होता. तर 20 मे रोजी निफ्टी 421.1 अंकांच्या तेजीसह 3.69 टक्क्यांनी वाढला होता. 20 मे रोजी निफ्टी 11,828.25 अंकांवर बंद झाला होता. 17 मे रोजी निफ्टी 37,930.77 अंकांवर होता.
म्हणजेच एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर शेअर बाजारावर परिणाम पडतो? यावेळी एक्झिट पोलमधून काय समोर येणार? यावरूनच शेअर बाजारातील घडामोडी अवलंबून असतील.
आणखी वाचा :
Sharad Pawar : निकालापूर्वी शरद पवारांचा मोठा निर्णय, विश्वासू नेत्यावर सोपवली जबाबदारी
मी विजयी होणार, कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली; निकालाआधीच नारायण राणेंना कॉन्फिडन्स