
Kashmiri Man Detained For Namaz Attempt in Ayodhya Ram Temple: अयोध्येतील राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एका काश्मिरी व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेनंतर हाय-सिक्युरिटी झोन असलेल्या मंदिर परिसरात दक्षता वाढवण्यात आली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील अहमद शेख (55) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्याने 'सीता रसोई' भागात बसून नमाज पठण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
त्याच्या हालचाली लक्षात येताच मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्याला रोखले. त्यानंतर त्याला अधिक चौकशीसाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखल्यावर त्याने घोषणाबाजी केल्याचे काही वृत्तांमध्ये म्हटले आहे, मात्र अधिकाऱ्यांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
गुप्तचर यंत्रणांनी त्याच्या अयोध्या दौऱ्याच्या उद्देशाबाबत तपास सुरू केला आहे. तो अजमेरला जात होता, असा प्राथमिक जबाब त्याने दिला आहे. त्याच्याकडून काजू आणि मनुके जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मकर संक्रांत आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापन दिन (22 जानेवारी) जवळ आलेला असताना घडलेली ही घटना सुरक्षा यंत्रणा गांभीर्याने घेत आहेत. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा आढावा घेतला. अयोध्या प्रशासन किंवा राम मंदिर ट्रस्टने या घटनेवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.