
कानपूरच्या कल्याणपूर परिसरात बुधवारी संध्याकाळी एका कारने १३ वर्षांच्या सायकलस्वार मुलाला चिरडलं. ही धक्कादायक घटना आवास विकास कॉलनीतील कैलाश विहारमध्ये संध्याकाळी ७ च्या सुमारास घडली.
आदी तिवारी असं या मुलाचं नाव असून तो आठवीत शिकतो. तो एस्कॉर्ट वर्ल्ड स्कूलचा विद्यार्थी आहे आणि कैलाश विहारमध्येच राहतो. त्याचे वडील संदीप तिवारी एका खासगी कंपनीत काम करतात, तर त्याचे आजोबा २००८ मध्ये पोलीस खात्यातून इन्स्पेक्टर म्हणून निवृत्त झाले आहेत.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आदी घराबाहेर सायकल चालवत होता. तेव्हा एक भरधाव कार त्याच्या दिशेने आली. आदीने सायकल थांबवून हाताने इशाराही केला, पण ड्रायव्हरने गाडी न थांबवता थेट त्याच्या अंगावर घातली.
टक्कर इतकी जोरदार होती की, आदी सायकलसह गाडीच्या मागच्या चाकाखाली अडकला. तरीही ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही, उलट गाडीचा वेग वाढवला. यात आदी जवळपास ३० फूट फरफटत गेला. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक धावले आणि त्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. गर्दी जमल्याचं पाहून ड्रायव्हर गाडी तिथेच सोडून पळून गेला.
Kanpur 🚨⚠️
Disturbing visuals 🚨
Ford Eco-Sport driver not well versed with driving or distracted?
Kid on the cycle at car drivers viewing angle + Ford Eco sport dragged kid for some distance…Kid injured.@DriveSmart_IN pic.twitter.com/riZBdtWm4A— Dave (Road Safety: City & Highways) (@motordave2) August 14, 2026
जखमी आदीला त्याच्या कुटुंबीयांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती ११२ कंट्रोल रूमद्वारे पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडी जप्त केली आणि कल्याणपूर पोलीस स्टेशनमध्ये आणली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताचा संपूर्ण थरार कैद झाला आहे, ज्यात कार मुलाला फरफटत नेत असल्याचं स्पष्ट दिसतंय.
ड्रायव्हरने जाणूनबुजून मुलाला चिरडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संदीप तिवारी यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेज आणि गाडीच्या नोंदणी क्रमांकावरून ड्रायव्हरची ओळख पटवली जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.