
झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका घराच्या अंगणात १२ वर्षांची मुलगी आणि तिच्या वडिलांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सर्वात भयानक बाब म्हणजे या १२ वर्षांच्या मुलीचा शिरच्छेद करण्यात आला असून तिचं डोकं गायब आहे.
ही मुलगी रात्री तिच्या आई-वडिलांसोबत झोपली होती. तिथूनच तिला उचलून नेण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला घराच्या मागच्या बाजूला नेण्यात आलं आणि तिथे एका धारदार शस्त्राने तिचं डोकं धडावेगळं करण्यात आलं.
डहुआ गावात जेव्हा अंगणात या मुलीचा मृतदेह सापडला, तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. तिचं डोकं गायब असल्याने ही घटना आणखीनच भयानक वाटत होती.
या घटनेनंतर गावात भीती आणि संतापाची लाट उसळली आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. आजूबाजूच्या परिसरात फक्त याच घटनेची चर्चा सुरू आहे.
माहिती मिळताच लालमटिया पोलीस ठाण्याचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी या गुन्ह्याच्या जागेची पाहणी केली. पोलिसांनी आता या हत्याकांडाचा तपास सुरू केला आहे.
या हत्येमागचं नेमकं कारण काय आणि हे कृत्य कोणी केलं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. तसंच, मुलीचं गायब झालेलं डोकं कुठे आहे, याचाही शोध सुरू आहे.
या दुहेरी हत्याकांडामागचं सत्य शोधून काढण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या १२ वर्षांच्या निष्पाप मुलीला कोणी आणि का मारलं, हे तपासाअंतीच स्पष्ट होईल.