
मुंबई : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चोसिती गावाजवळ गुरुवारी झालेल्या भीषण ढगफुटीत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतून 167 जणांची सुटका करण्यात आली असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली आणि चिखलगाळात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मचैलमाता यात्रेदरम्यान दुर्घटना
किश्तवाड शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर असलेले चोसिती हे मचैलमाता मंदिराच्या मार्गावरील शेवटचे गाव आहे. 25 जुलैपासून सुरू असलेल्या मचैलमाता यात्रेसाठी येथे मोठ्या संख्येने भाविक जमले असताना, गुरुवारी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास ढगफुटी झाली. पाण्याच्या प्रचंड लोंढ्यांसह मातीच्या ढिगाऱ्यांनी अनेक घरे उद्ध्वस्त केली. वाचवण्यात आलेल्या 38 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, लष्कर आणि स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य वेगाने सुरू आहे. दरम्यान, दुर्घटनेनंतर यात्रा तात्काळ स्थगित करण्यात आली.
सरकारी आणि केंद्रीय पातळीवरील हालचाल
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. “परिस्थिती गंभीर आहे आणि बचावकार्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत,” असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ढगफुटी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सर्वांसाठी प्रार्थना व्यक्त केली असून, मदतकार्य वेगाने सुरू असल्याचे सांगितले आहे.
हिमाचल प्रदेशालाही पुराचा फटका
दरम्यान, हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांनाही ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरांनी तडाखा दिला आहे. सध्या 396 रस्ते बंद असून, अनेक घरे आणि वाहने वाहून गेली आहेत. शिमल्यातील काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सुदैवाने गुरुवारी हिमाचल प्रदेशात कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.