beer competition : संक्रांतीच्या सणासाठी गावी गेलेल्या दोन आयटी कर्मचारी मित्रांनी बीअर पिण्याची स्पर्धा लावली. जास्त बीअर प्यायल्यामुळे दोघेही बेशुद्ध पडले आणि रुग्णालयात नेत असताना व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आंध्र प्रदेशातील अन्नमया जिल्ह्यातील पांडवारी पल्ली गावचा रहिवासी मणिकुमार (34) चेन्नईमध्ये आयटी कर्मचारी म्हणून काम करत होता. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याच गावातील त्याचा मित्र पुष्पराज (26) हा देखील आयटी कंपनीत कामाला होता. दोघेही संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गावी आले होते.
24
बीअर पिण्याची स्पर्धा
खूप दिवसांनी सर्व मित्र एकत्र आल्याने त्यांनी बीअर आणि दारूच्या बाटल्या विकत घेतल्या आणि गावाबाहेरील एका निर्जन ठिकाणी गेले. त्यावेळी मित्रांमध्ये कोणी जास्त बीअर प्यायची, अशी स्पर्धा लागली. यात मणिकुमार आणि पुष्पराज यांनी स्पर्धेत भाग घेतला आणि बीअर प्यायली.
34
साडेचार तासांत 19 बीअर
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 3 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत त्यांनी 19 बीअर प्यायल्या. त्यामुळे दोघेही अचानक बेशुद्ध पडले. हे पाहून घाबरलेल्या मित्रांनी त्यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता मणिकुमारचा वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर पुष्पराजवर उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. अतिमद्यपानामुळे मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. त्यांच्यासोबत बीअर पिणारे इतर 4 जण सुखरूप आहेत.