Inspiring Story: दिवसभर नोकरी, रात्री बाईक टॅक्सी, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट क्रिएशन... आणि या सगळ्यात वेळ मिळाला तर स्वतःसाठी जेवण बनवणं. या सगळ्या धावपळीत एक तरुण PhD सुद्धा करत आहे. त्याची ही प्रेरणादायी गोष्ट सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे.
आजची तरुण पिढी छोट्या-छोट्या समस्यांमुळे लगेच खचून जाते. परीक्षेत नापास झाल्यामुळे, नोकरी मिळत नसल्यामुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात. पण काही जण असेही असतात जे 'प्रयत्नांती परमेश्वर' हे सिद्ध करतात. कितीही संकटं आली तरी ते सकारात्मक राहून संघर्ष करतात. अशाच एका तरुणाची प्रेरणादायी गोष्ट आपण जाणून घेऊया.
23
मनात आणलं तर काहीही शक्य आहे..
आपल्यापैकी अनेकजण शिक्षण, नोकरी आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना 'वेळच मिळत नाही' अशी तक्रार करतात. पण एका तरुणाने हे सिद्ध केलंय की, मनात आणलं तर कशासाठीही वेळ काढता येतो. त्याचीच गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सकाळी 9 ते 5 नोकरी, रात्री बाईक टॅक्सी ड्रायव्हर, सोबत PhD, स्वयंपाक, व्हिडिओ एडिटिंग आणि कंटेंट क्रिएशन... इतकी सगळी कामं करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे दीपक पांडे. दीपकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं, 'पूर्वी 9-5 नोकरी करून माझ्यातली सगळी ऊर्जा संपून जायची. पण आता तोच संध्याकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत बाईक टॅक्सी चालवतो, स्वतः जेवण बनवतो, व्हिडिओ एडिट करतो आणि PhD सुद्धा करतोय. विशेष म्हणजे, तो आता खूप आनंदी आहे आणि तो दुसरा कोणी नसून मीच आहे.' त्याचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मनाला भावला आहे.
33
बाईक टॅक्सी चालवत करतोय PhD..
दीपक पांडे पुढे लिहितो, 'मी आज इतका आनंदी का आहे माहितेय? कारण आयुष्यात पहिल्यांदाच मला माझ्या क्षमतेची जाणीव झाली. 'लोक काय म्हणतील?', 'मी हे करू शकेन का?', किंवा 'नवीन काहीतरी करण्यासाठी नोकरी सोडावी लागेल' यांसारख्या भीतीमुळे मी माझ्यातल्या टॅलेंटला कधीच ओळखलं नाही. पण हळूहळू मी स्वतःला बदलायला सुरुवात केली. आधी PhD साठी प्रवेश घेतला, मग बाईक टॅक्सी चालवायला सुरुवात केली आणि त्यानंतर कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातही उतरलो. आज मी या सगळ्या गोष्टी एकाच वेळी मॅनेज करू शकतोय.' पांडे तरुणांना सल्ला देतो की, 'तुमच्यात काही पॅशन असेल तर त्यासाठी आत्ताच प्रयत्न सुरू करा. नोकरी सोडण्याची वाट पाहू नका. अडचणी येतील, पण जेव्हा तुम्ही तुमची क्षमता ओळखाल, तेव्हा त्या कष्टांमध्येही तुम्हाला आनंद मिळू लागेल.' त्याच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्याचं कौतुक करत आहेत आणि 'तू खऱ्या अर्थाने आजच्या पिढीसाठी प्रेरणा आहेस' असं म्हणत आहेत.