Cleanest City : सलग आठव्यांदा इंदूर भारतातील सर्वात स्वच्छ शहर, नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

Published : Jul 17, 2025, 12:09 PM ISTUpdated : Jul 17, 2025, 12:10 PM IST
indore

सार

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत दरवर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणात, इंदूरने वर्षानुवर्षे अव्वल क्रमांक राखत एक नवा विक्रमच रचला आहे.

नवी मुंबई - स्वच्छतेचा विचार आला, की आपल्याला अनेकदा परदेशातील रस्ते, स्वच्छ परिसर, हरित व पर्यावरणपूरक सुविधा आठवतात. पण भारतातसुद्धा असं एक शहर आहे ज्याने सलग आठ वेळा भारतातील ‘सर्वात स्वच्छ शहर’ होण्याचा बहुमान पटकावला आहे आणि ते शहर म्हणजे इंदूर!

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत दरवर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणात, इंदूरने वर्षानुवर्षे अव्वल क्रमांक राखत एक नवा विक्रमच रचला आहे. 2025 मध्ये इंदूरने सलग आठव्यांदा स्वच्छतेचा किताब पटकावून पुन्हा एकदा सिद्ध केले की लोकसहभाग, इच्छाशक्ती आणि प्रभावी प्रशासन यांचं योग्य मिश्रण असेल, तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात.

इंदूरची प्रेरणादायी वाटचाल

इंदूर हे मध्य प्रदेशातील एक औद्योगिक, व्यापारी आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाचं शहर. काही वर्षांपूर्वीपर्यंत इंदूर इतर शहरांसारखंच, रहदारीने गजबजलेलं, गलिच्छ रस्त्यांचं आणि कचर्‍याच्या ढिगाऱ्याचं एक सामान्य शहर होत.

मात्र २०१६ मध्ये केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यानंतर इंदूरने या आव्हानाला एका संधीसारखं स्वीकारलं. स्थानिक प्रशासन, नगरपरिषद, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक सगळ्यांनी मिळून शहरात क्रांती घडवली.

कचरा वेगळा करा, क्रांतीची सुरुवात

इंदूरची सर्वात मोठी ताकद ठरली 'घरोघरी कचरा वेगळा करणे' ही संकल्पना. शहरातल्या प्रत्येक घरी ओल्या आणि सुका कचरा वेगळा करण्याचा नियम सक्तीने राबवण्यात आला. नगरपालिकेने सुसज्ज वाहनांद्वारे दररोज घरपोच कचरा उचलण्याची व्यवस्था केली. वाहनांवर लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना स्वच्छतेबाबत माहिती दिली जाऊ लागली. शाळांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीमा राबवल्या गेल्या. शहरभर 'स्वच्छता ब्रँडिंग' करण्यात आले. भिंतींवर आकर्षक चित्रं, श्लोक, संदेश लिहून लोकांमध्ये अभिमान निर्माण करण्यात आला.

प्रशासनाची सक्रियता आणि पारदर्शकता

इंदूरच्या यशामागे स्थानिक प्रशासनाची सततची सक्रियता आणि प्रत्येक बाबतीत पारदर्शक कार्यपद्धती हे दोन मुख्य घटक होते.शहरात 'स्वच्छता कमांड कंट्रोल सेंटर' स्थापन करण्यात आले. GPS प्रणालीवर आधारित कचरा संकलन वाहनांची ट्रॅकिंग सुरु झाली. महत्त्वाचे म्हणजे प्रशासन फक्त नियम लावण्यात नाही, तर नागरिकांना समजावण्यात, त्यांचं ऐकण्यात आणि त्यांना सहभागी करून घेण्यात यशस्वी ठरले.

स्वच्छतेचा गौरव, सलग आठ वर्षं

इंदूरने २०१७ पासून सलग प्रत्येक वर्षी स्वच्छतेचा सर्वोच्च सन्मान मिळवला. २०२५ मध्ये, आठव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरने इतिहास रचला. या वर्षी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सुरत दुसऱ्या, तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर होती. पण इंदूरने पुन्हा एकदा सिद्ध केले की केवळ आधुनिक तंत्रज्ञान नव्हे, तर लोकसहभाग आणि दृढ इच्छाशक्ती हेच खरे यशाचे मार्ग आहेत.

नागरिकांचा अभिमान

इंदूरचा प्रत्येक नागरिक स्वतःला "स्वच्छता दूत" समजतो. घराच्या बाहेर पडताना रस्त्यावर कचरा टाकणे त्यांना लज्जास्पद वाटते. स्वच्छतेबाबत शाळांमध्ये विशेष वर्ग, स्पर्धा, निबंध लेखन, चित्रकला – या गोष्टींनी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत स्वच्छतेची सवय लागली आहे."इंदूर माझं घर आहे, आणि मी त्याचा स्वच्छता रक्षक आहे" ही भावना इथे प्रत्येकात आढळते.

पर्यावरणपूरक दृष्टिकोन

इंदूरने केवळ कचरा व्यवस्थापनच नाही, तर हरित क्षेत्र वाढवणे, प्लास्टिकवर बंदी, कंपोस्ट युनिट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा वापर यांसारख्या अनेक पर्यावरणपूरक गोष्टी अंगीकारल्या आहेत. शहरात अनेक "झिरो वेस्ट झोन" तयार करण्यात आले आहेत. उरलेल्या अन्नाचा वापर कंपोस्टमध्ये होतो. फुलांचा वापर अगरबत्ती आणि इतर उत्पादने बनवण्यासाठी होतो.

इतर शहरांसाठी प्रेरणा

इंदूरच्या या यशामुळे आता देशभरातील इतर शहरांनाही स्वच्छतेच्या दिशेने चालण्याची प्रेरणा मिळाली आहे. सुरत, नवी मुंबई, अमृतसर, मैसूर, भोपाळ यांसारखी शहरे आता त्याच धर्तीवर काम करत आहेत. महाराष्ट्रातही पुणे, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई यांसारख्या शहरांनी चांगली कामगिरी दाखवली आहे, पण इंदूरचा सातत्यपूर्ण अव्वलपणा ही खरोखरच एक प्रेरणादायी गोष्ट आहे.

भविष्यातली दिशा

इंदूरचे स्वप्न आहे की फक्त भारतातीलच नव्हे, तर जगातील एक सर्वात स्वच्छ आणि हरित शहर म्हणून आपली ओळख निर्माण करावी. शहराच्या स्मार्ट सिटी योजनेखाली आता अधिक आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, स्मार्ट कचरा प्रक्रिया केंद्र उभारली जात आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या IndiGo वर कठोर कारवाई होणार, सरकारचा संसदेत इशारा!
कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, तपासात मात्र मोठा ट्विस्ट उघडकीस!